सातारा जिल्ह्यात कोरोनामक्ती 11 हजाराच्या पार : 25 बळी, 621 बाधित

  • सोमवारी 252 कोरोनामुक्त; वाढता मृत्यूदर वाढवतोय चिंता
  • सातारा, कराडमध्ये वाढ सुरुच; कोरोना बळी 500 च्या पार
  • जिल्हा बँकेत 25 बाधित; जिल्हाधिकारी कार्यालयात 6 बाधित
  • गोव्यातील युवकावर खोटा गुन्हा; चिखलीच्या महिलेच्या रिपोर्टमध्ये गोंधळ
  • कृष्णा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड वाढणार

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – जिल्हय़ात ऑगस्ट आणि आता सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कहर प्रचंड वाढला. यामध्ये सातारा, कराडसह सर्व जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 19 हजारांच्या उंबरठय़ावर उभी असून रविवारी रात्रीच्या अहवालात बाधितांची संख्या कमी आल्याने दिलासा मिळाला. मात्र रात्री उशिरा येत असलेल्या अहवालांचा धसका लोकांनी घेतलाय. कोरोना वाढीचे सत्र थांबावे व जिल्हा कोरोनामुक्त व्हावा म्हणून मग लोकच स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन करुन घेवू लागले आहेत. कोठूनतरी संसर्ग साखळी लवकर तुटावी हीच प्रार्थना सर्वजण करत असले तरी 25 कोरोना बळींनी चिंता वाढवली असून वाढता मृत्यूदर व वाढती बाधितांची संख्या याचे आव्हान जिल्हय़ापुढे आहेच.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 498 जणांचा अहवाल बाधित आला आहे. तर सोमवारी अहवालात 25 जणांचा कोरोना बळी गेला असल्याची माहिती देण्यात आलीय. कोराना बळींची एकूण संख्या 513 झाली असून शुक्रवारी 25 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी 252 एवढय़ा जणांनी कोरोनावर मात केली असून रात्री उशिरा अहवालात 621 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला. मात्र 2,452 जणांची टेस्टिंग केल्यानंतर हा बाधितांचा आकडा समोर आला असून हे प्रमाण कमी असल्याने संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्हय़ात 25 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा येथे भरतगाव 65 वर्षीय पुरुष, कुडाळ, ता. जावली 76 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड 60 वर्षीय महिला, वडूज ता. खटाव 65 वर्षीय पुरुष, इस्लामपूर 80 वर्षीय पुरुष, ढोरगल्ली 70 वर्षीय महिला, विद्यानगर कराड 67 वर्षीय पुरुष, पुसेगाव ता. खटाव 43 वर्षीय पुरुष, वेण्णानगर 55 वर्षीय महिला, वाठार किरोली, ता. कोरेगाव 70 वर्षीय महिला, कोंडवे ता. सातारा 40 वर्षीय पुरुष, खावली, ता. सातारा 70 वर्षीय महिला. विविध खासगी रुग्णालयातील भांडवली ता. माण 70 वर्षीय पुरुष, उंचीठाणे, ता. खटाव 65 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड 57 वर्षीय महिला, सैदापूर कराड 76 वर्षीय पुरुष, रेठरे ता. कराड 69 वर्षीय महिला, सोमवार पेठ 72 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण 54 वर्षीय पुरुष, करंजे पेठ 58 वर्षीय महिला, एमआयडीसी सातारा 90 वर्षीय महिला, आसरे ता. वाई 78 वर्षीय महिला, कासेगाव 72 वर्षीय महिला, पांडे ता. वाई 65 वर्षीय महिला, मंगळवार पेठ 86 वर्षीय पुरुष असे एकूण 24 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यातील 252 जणांची कोरोनावर मात
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 252 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे यामुळे कोरोना मुक्ती 11 हजाराच्या पार गेेेली असून एकूण कोरोना मुक्तांंची संख्या 11029 एवढी झाली असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड वाढणार
कराड तालुक्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाग्रस्त रूग्णांची अधिक सोय व्हावी या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटलने ऑक्सिजन बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हॉस्पिटलच्या माध्यमातून वाठार येथील कृष्णा फौंडेशन कॅम्पस येथे 70 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता लवकरच कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळपास एकूण 500 कोरोनाग्रस्त रुग्णांची सोय होणार आहे.
जिल्हा बँकेत 25 बाधित
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषदेचे समोरील मुख्य शाखेत अधिकाऱ्यांसह 25 कर्मचारी बाधित आली असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत त्यातील काहींना होम आयसोलेट केले आहे. यामुळे जिल्हा बँकेत काळजी घेण्यात येऊ लागले असून जिल्हाधिकारी कार्यालयात देखील सहाजणांचे अहवाल बाधित आले असल्याने आवश्यक त्यांनीच काम असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गोव्यातील युवकावर खोटा गुन्हा
गोवे, ता. सातारा एका युवकाचा खासगी लॅबमध्ये रिपोर्ट बाधित आला. त्याने त्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेट होण्याचा पर्याय निवडला. त्या युवकाने याबाबत लिंब प्राथमिक आरोग्य केंद्राला तशी कल्पना दिल्यावर त्याच्याकडील सुविधांची पाहणी करुन त्याला होम आयसोलेट करण्यात आले. याबाबत आरोग्य सेविकांनी गोवे गावच्या ग्रामस्तरीय समितीला कल्पनाही दिली होती. मात्र त्यावर कोणीतरी तक्रार केल्यावर ग्राम समितीने त्याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर त्याच्यावर बाधित असताना विनापरवानगी गावात आल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखलीच्या महिलेचा रिपोर्टचा गोंधळ
चिखलीतील एक गरदोर महिला तिचा रिपोर्ट जिल्हा रुग्णालयात बाधित आला असल्याचे सांगितल्यावर ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्राने तिच्यावर त्या महिलेला तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी दबाव आणला. तिच्यासह तिच्या कुटुंबियांनी येण्यास नकार दिल्यावर दमदाटी केली. मात्र आमचा रिपोर्ट दाखवा असे म्हटल्यावर रिपोर्ट नाही यादीत त्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले. नंतर तिच्या पतीने त्या महिलेसह सर्व कुटुंबियांची टेस्ट थोरात लॅबमध्ये केली ती निगेटिव्ह, दिशा लॅबमध्ये केली ती निगेटिव्ह आली, बोकीलमध्ये केली ती निगेटिव्ह आली. मात्र तरी देखील शासकीय यादीत त्यांचे नाव बाधित लिस्टमध्ये कसे असा सवाल त्या कुटुंबाला पडलाय. असा गोंधळ थांबवून लोकांना भयमुक्त करण्याची गरज आहे.
1007 जणांचे नमुने तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10,उपजिल्हा रुग्णालय कराड 40, उपजिल्हा रुग्णालय फलटण 105, कोरेगाव 46, वाई 62, खंडाळा 135, रायगांव 68, पानमळेवाडी 107, मायणी 89, महाबळेश्वर 70, दहिवडी 43, खावली 40, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 192 असे एकूण 1007 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 49,267, एकूण बाधित 19,609, एकूण कोरोना मुक्त 11,029, मृत्यू 513, उपचारार्थ रुग्ण 8,067
सोमवारी एकूण बाधित 621, एकूण मुक्त 252, एकूण बळी 25

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here