मिरजेत शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन

भारतीय जनता पार्टी व आ. सुरेश खाडे यांचे विशेष सहकार्य

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – मिरज-पंढरपूर रस्त्यावर बालाजी मंगल कार्यालय येथे उभारण्यात आलेल्या शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन शनिवारी मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. निखिल पाटील, डॉ. तुषार पिड्डे, डॉ. श्रीकांत सगरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे, भाजप नेते मोहन वनखंडे सर, उपमहापौर आनंदा देवमाने, नगरसेवक पांडुरंग कोरे, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेविका सौ. अनिता वनखंडे, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, नंदकुमार कोरे, सुमेध ठाणेदार, सागर वनखंडे, डॉ. शोभा पोरे, डॉ. श्रवणकुमार कागले, डॉ. इम्रान जमादार व कर्मचारी उपस्थित होते.
भाजप आमदार सुरेशभाऊ खाडे व भाजप मिरज विधानसभा क्षेत्र यांच्या विशेष सहकार्याने सदरचे ३२ बेड्चे हॉस्पिटल केवळ चार दिवसात उभे करण्यात आले आहे. याठिकाणी तळमजल्यावर सर्व ३२ बेड्सना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असून वरील मजल्यावर १८ रुग्णांची आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर हॉस्पिटलमध्ये एक्स-रे, फार्मसी, लॅबोरेटरी, इसीजी अशा सर्व सुविधा उपलब्ध असून सर्व रुग्णांना सकस व उत्तम प्रकारचे जेवण, चहा, नाश्ता दिला जाणार आहे. अनुभवी अशा नर्सिंग स्टाफची नेमणूक करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. हॉस्पिटल मध्ये प्रशस्त कंपार्टमेंट्स असून प्रत्येक रुग्णांसाठी ऑक्सिजन व्यवस्था देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना आ. सुरेश खाडे यांनी सांगितले कि, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व अपुरी पडत असलेली हॉस्पिटल्स लक्षात घेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलची उभारणी डॉ. पिडडे व त्यांच्या सहकाऱ्यानी केली आहे. अवघ्या चार दिवसात या हॉस्पिटलची उभारणी करणाऱ्या या टीमचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने व रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत या हेतूने आमदार या नात्याने आपण स्वतः तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी या हॉस्पिटलला सर्वतोपरी मदत केली आहे व पुढेही करणार आहे. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा निश्चितच समाधानकारक आहेत.
यावेळी बोलताना डॉ. तुषार पिड्डे यांनी सांगितले कि, एक डॉक्टर या नात्याने कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्व सहकारी एकत्र आलो व कोविड हॉस्पिटल उभे केले. वाढते रुग्ण व अपुरी यंत्रणा या परिस्थितीत एक खारीचा वाटा उचलण्याचे काम आम्ही केले असून जास्तीत जास्त चांगली सेवा व सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य तसेच भाजपचे पदाधिकारी यांचे सहकार्य याकामी अत्यंत मोलाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here