कै.आनंद गोसावी यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांच्या धनादेशाचे वितरण

रहिमतपूर , ता.कोरेगाव (सुनिल भोसले) – येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या आनंद गोसावी यांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा ५० लाख रुपयांचा धनादेश व रहिमतपूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी जमा केलेल्या एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
कै. आनंद गोसावी यांना कटापूर येथे कार्यरत असताना कोरोना महामारीची बाधा झाली, व खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आनंद गोसावी यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर अचानक संकट कोसळले. या परिस्थितीत रहिमतपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत असा आनंद गोसावी यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला.
याच संकल्पनेतून सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन एक लाख रुपये जमा करून शासनाच्या ५० लाख रुपयांच्या धनादेशा बरोबर गोसावी कुटुंबियांना प्रदान केला. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक वाघ, पोलीस शिपाई सचिन राठोड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here