नेरुळ सेक्टर- १२ मध्ये रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत; घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराईचा धोका

काँग्रेसचे विरेंद्र म्हात्रे यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

नवी मुंबई (प्रतिनिधी) – नेरुळ सेक्टर-१२ मधील श्री गणपती मंदिराच्या समोरील रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट स्थितीत असून पावसल्यामुळे याठिकाणी पाणी साचून तेथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे सदर समस्येचे निवारण करतानाच रस्ता रुंदीकरणाचे राहिलेले अर्धवट काम देखील पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ‘ नवी मुंबई जिल्हा काँग्रेस’ चे सचिव तथा ‘लायन हार्ट ग्रुप’नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र यशवंत म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. या संदर्भात विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना सदरची मागणी करणारे पत्र दिले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेरुळ,सेक्टर-१२ मधील श्री गणपती मंदिरासमोरील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, ठेकेदाराने सदरचे काम अर्धवट स्थितीत ठेवल्यामुळे सदर रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सध्या नवी मुंबई मध्ये ‘ कोरोना’ चा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे.त्यातच सदर ठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या घाणीमुळे साथीचे आजार परिसरात पसरण्याची भीती विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.
त्यामुळे सदर कामाच्या संबंधीत ठेकेदाराला लवकरात लवकर अर्धवट ठेवलेले रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणीही विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here