चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची मागणी
चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – कोविड 19 आजारासंबंधी कामकाजासाठी सेवा अधिग्रहीत केलेल्या शिक्षकांना शासनाचे कार्यमुक्तीचे आदेश असल्यानंतरही प्राथमिक , माध्यमिक ,उच्च माध्यमिक व आश्रमशाळांमधील शिक्षकांना “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेअंतर्गत दररोज 50 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यात विविध प्रकारच्या 22 मुद्यांची माहिती भरावी लागते.या कामकाजात शिक्षकांचा संपूर्ण दिवसाचा वेळ वाया जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.
माझे कुटुंब-माझी जबाबदारी या सर्वेक्षण मोहिमेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि 11 सप्टेंबर 2020 च्या परिपत्रकात शिक्षकांना सदरील सर्वेक्षणाची जबाबदारी देण्याबाबत स्पष्ट उल्लेख नसतानाही नाहक शिक्षकांना सदर कामात अडकविले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेमार्फत चोपडा नगरपालिकाचे मुख्याधिकारी अविनाश गांगोड़े,पंचायत समितिचे गटविकास अधिकारी भरत कोसोदे,गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष मंगेश भोईटे , उपाध्यक्ष ,सचिव ,सहसचिव , शिक्षक भारती संघटनाचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







