नागपूर (विशेष प्रतिनिधी) – २२ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घटना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील प्रतापनगर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी ३२वर्षीय तृतीयपंथीयाविरुद्ध अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीयाचा मसाल्याचा व्यापार आहे. गेल्या वर्षी २०१९ मध्ये गरब्याच्या कार्यक्रमात त्याची तरुणीसोबत ओळख झाली. त्याने तरुणीला गोड बोलून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गोवले. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तिला घरी बोलाविले. पण त्यावेळी त्याने कपटी कारस्थान करण्याचे ठरविले. वाढदिवसानिमित्त त्याने काही खाण्याचे पदार्थ आणि शीतपेय आणले होते. त्याच पेयातून तिला गुंगी येण्याचे औषध दिले. काही वेळानंतर ही तरुणी बेशुद्ध झाली. त्याने तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, त्याचे अन्य युवकासोबत शारीरिक संबंध असल्याचे तरुणीला समजले. त्यामुळे त्याच्या प्रेमात असलेली तरुणीने अत्याचार आणि इतर तरूणाशी असलेल्या संबंधामुळे त्याच्याशी संपर्क तोडला.
पण, संबंध तोडल्यानंतरही हा तृतीयपंथीय तरूण तरुणीला वारंवार धमकी द्यायला लागला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तरूणीने पोलिसांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला. तरुणीने प्रतापनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तृतीयपंथीयाचा शोध सुरू केला आहे. तो सध्या फरार असल्याचे कळते आहे.







