वस्त्रोद्योग आणि मुंबईची प्रगती याचा लेखाजोखा मांडणारा इतिहास टेक्सटाईल म्युझियमच्या रूपात मांडला जाणार

anil-galgali

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – इंडिया युनायटेड मिलची मुंबई महापालिकेच्या ताब्यात आलेल्या जागेवर असलेल्या शंभर वर्षांपूर्वीच्या गिरणीच्या इमारतींपैकी “हेरिटेज दर्जा” असलेल्या इमारतींचे मूळ रूपात संवर्धन केले जाणार आहे. त्यामध्ये वस्त्रोद्योग आणि त्या अनुषंगाने मुंबई शहराने केलेली प्रगती याचा लेखाजोखा मांडणारा इतिहास पुढील पिढ्यांसाठी “टेक्सटाईल म्युझियम”च्या रूपात मुंबई महानगरपालिकेच्या “पुरातन वास्तूजतन विभागामार्फत” मांडला जाणार आहे. टप्प्याटप्प्याने पूर्ण होणाऱ्या कामास कोव्हीडमुळे जरी ब्रेक लागला असला तरी डिसेंबर 2020 पर्यंत 3 पैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. जलपटावर मुंबई व कापड गिरणीचा इतिहास प्रदर्शित होणार असून सर जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चर प्रमुख भूमिका निभावित आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे निर्माणधीन टेक्सटाईल म्युजियमची विविध माहिती मागितली होती. वरिष्ठ पुरातन वास्तू जतन अभियंता संजय आढाव यांनी अनिल गलगली यांस कळविले की प्रथम टप्प्याचे काम युद्धस्तरावर सुरु असून सद्यस्थितीत कोव्हीड 19 च्या प्रादुर्भावामुळे सहा महिन्यांच्या वाढीव कालावधी म्हणजे डिसेंबर 2020 पर्यंत देण्यात आलेला आहे.
टप्पा 1 अ चे काम 15 जानेवारी 2019 रोजी सुरु झाले असून यात तळे व सभोतालचा परिसर सुशोभिकरण करुन बहुउद्देशीय प्लाझा व वस्त्रोद्योगावर म्युरल बनविण्यात येणार आहे., यावर 6.03 कोटी खर्च येणार असून आजमितीला 1.27 कोटी रुपये कंत्राटदार मेसर्स सवानी कन्स्ट्रक्शन कंपनीला अदा करण्यात आले आहे. आजमितीला बहुउद्देशीय प्लाझाचे बांधकाम सुरु आहे.
टप्पा 1 ब अंतर्गत विविध प्रकारच्या नळीच्या तोंडाद्वारे संगीत कारंजे निर्माण करून जलपटावर मुंबई व कापड गिरणीचा यांचा इतिहास प्रदर्शित करण्याकरिता लघुपट तयार करणे, प्रदर्शन करणे व पुढील 4 वर्षे प्रचलन व परिरक्षित करण्याचे काम आहे. सदर 4 वर्षाकरिता एकूण 28 विविध लघुपट निर्माण करुन जलपटावर प्रदर्शित करण्याचे काम आहे. हे काम 13 नोव्हेंबर 2019 रोजी सुरु झाले असून एकूण खर्च 23.57 कोटी रुपये इतके आहे. सदर काम मेसर्स देव एस व्ही प्रीमियम वर्ल्ड कन्सोटियम आहे. आजमितीला संगीत कारंज्यासाठी लागणारे सामान तयार करणे व पुरवठा करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
दोन्ही कामात आर्किटेक्ट आणि सल्लागार सर जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चर आहेत. पहिल्या कामाचे शुल्क 30.15 लाख रुपये असून त्यापैकी 15.67 लाख रुपये अदा करण्यात आले आहे., तर दुसऱ्या कामाचे शुल्क 1.18 कोटी रुपये असून त्यापैकी 47.15 लाख रुपये अदा करण्यात आले आहे.
टप्पा क्रमांक 2 साठीची निविदा प्रक्रिया प्रशासकीय मंजूरीच्या प्रतिक्षेत असून सल्लागार सर जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चर यांनी अंदाजित 268 कोटी रुपयांच्या निविदा तयार केली आहे. त्यासाठी एकूण सल्लागार शुल्क 13.40 कोटी रुपये इतके असून आतापर्यंत 2.01 कोटी रुपये शुल्क अदा करण्यात आले आहे. तर तिसऱ्या टप्प्यात म्युजियमचे प्रत्यक्ष काम सुरु होईल.
वर्ष 1890 ला इंडिया युनायटेड मिल बांधली गेली असून या गिरणीचे आगळेवेगळे महत्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या वाटयाला आलेल्या 44 हजार चौरस मीटर जागेवर टेक्सटाईल म्युजियम बांधण्यास सुरवात केली असून भविष्यात हे एक रमणीय स्थळ बनेल. मुंबई आणि कापड गिरणीचा इतिहास सोबत लघुपटाचा आनंद मनसोक्त घेता येईल, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.

https://www.facebook.com/764999096874209/posts/4584867748220639/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here