थरारक पाठलागानंतर पोलिसांनी 2 किलो गांजासह केली तिघांना अटक

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – मोटारीतून छुप्या पद्धतीने नेण्यात येणारा गांजा पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडला. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसमोरून पाठलाग करून भवानी मंडप परिसरात मोटार पकडण्यात आली. सूरज विजय गोडसे (वय 25, रा. येडेमच्छिंद्र, वाळवा), रितेश राकेश सूर्यगंध (21, ओझर्डे, वाळवा) व रोहित लक्ष्मण भोसले (25, रा. रेठरे बुद्रुक, वाळवा) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 2 किलो 300 ग्रॅम गांजा, मोबाईल व मोटार असा सुमारे 4 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहर वाहतूक शाखेचे पोलिस गुलाब मुल्लाणी हे शुक्रवारी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौकात बंदोबस्ताला होतो. सायंकाळी उद्यमनगरकडून आलेली काळ्या रंगाची मोटार त्यांनी अडवली. पण त्यांना पाहून चालक रोहित भोसले याने मोटार सुसाट टेंबे रोडवरून पळवली. याची माहिती मुल्लाणी यांनी कंट्रोल रूमला कळवत या मोटारीचा पाठलाग केला. मोटार टेंबे रोडवरून मिरजकर तिकटीजवळ आली. या चौकात जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल गजानन परीट, रूपेश कुंभार व प्रीतम मिठारी यांनी या मोटारीचा पाठलाग करत येणार्‍या मुल्लाणी यांना पाहिले.
पोलिस पाठलाग करत असल्याने मोटार चालकाने गर्दीतून मोटार बालगोपाल तालीममार्गे भवानी मंडपाकडे नेली. पण पुढे रस्ता बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. पाठीमागून आलेल्या पोलिसांनी ही मोटार अडवली. मोटार कोणत्या कारणाने पळविली, असा प्रश्न चालकाला करत मोटारीची झडती घेतली असता गांजाच्या पुड्या पोलिसांना मिळून आल्या. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी गांजा व संशयिताचे मोबाईल जप्त करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रात्री उशिरा तिघांना अटक करण्यात आली.
संशयितांपैकी रितेश हा इस्लामपुरातील एका बिल्डिंगवर कामाला आहे. तो मित्र सूरज व रोहित यांच्यासोबत इस्लामपूरला जाण्यासाठी मोटारीत बसला, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. गांजाशी आपला संबंध नसून आपण फक्त सोबत चाललो होतो, असे तो सांगत होता. सूरज गोडसे याचे कोल्हापुरात किरकोळ काम असल्याने तिघेही कोल्हापुरात आले होते, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
मोटारीचा पाठलाग करून संशयितांना पकडणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे गांजा पकडण्यात आला. संशयित गांजा इस्लामपुरातील व्यक्तीला देणार होते, अशी माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. हा गांजा कोणाकडून आणला व तो कोणाला देण्यात येणार होता याची माहिती घेऊन मुख्य संशयिताला अटक करणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here