ड्रग प्रकरणातील कलाकारांचे शूटिंग बंद पाडू – रामदास आठवले

मुंबई (हितेश मिस्त्री) – बॉलिवूडमधील कलाकार हे तरुणाईसाठी आदर्श असतात. त्यामुळे ड्रग प्रकरणात गुंतलेल्या कलाकारांविरोधात कारवाई व्हायला हवी. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या प्रकरणाचा तपास करत आहे. हा तपास निःपक्षपाती व्हावा एवढीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची अपेक्षा असल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले.
ड्रग प्रकरणाशी संबंधित असलेल्या कलाकारांना घेऊन मनोरंजनसृष्टीत कोणीही सिनेमा, वेबसीरिज किंवा अन्य कोणताही कार्यक्रम चित्रीत करू नये. जर कोणी असे करत असेल तर आरपीआय त्यांचे शूटिंग बंद पाडेल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ड्रग प्रकरणी सध्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींची चौकशी करत आहे. पण या प्रकरणात कोणी अभिनेता वा अन्य कोणीही गुंतले असल्यास त्यांच्या विरोधातही कारवाई व्हायला हवी. चौकशीत महिला पुरुष असा भेदभाव नको, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले.
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालिअन या दोघांचा मृत्यू वेगवेगळ्या दिवशी झाला. पण या मृत्यूविषयी आजही रहस्य कायम आहे. सुशांत आणि दिशाने आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, याचा तपास होणे आवश्यक आहे. हा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने कसून तपास करुन सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालिअन यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून काढावे. लोकांच्या मनातील शंकांचे मळभ दूर होणे आवश्यक आहे. सीबीआयने तपास पूर्ण करुन त्याचे निष्कर्ष जाहीर करावे, अशी मागणी आठवलेंनी केली.
अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. या एफआयआरच्या आधारे अनुराग कश्यपला अटक करुन त्यांची चौकशी करणे अपेक्षित आहे. मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला अटक करावी, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली.
भारतात ड्रगला बंदी आहे. कायद्यानुसार ड्रगशी संबंधित व्यवहार करणे, ड्रगची वाहतूक करणे, ड्रग बाळगणे अशा गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणाची चौकशी करताना पक्षपात करू नये. दोषींवर कायद्याच्या आधारे कारवाई करावी. ड्रग रॅकेटशी संबंधित अथवा ड्रग घेणारे कलाकार हे आदर्श असू शकत नाही. त्यामुळे ड्रग प्रकरणात गुंतलेले कोणीही असू दे, कलाकार म्हणून ते कितीही मोठे असले तरी कायद्याच्याआधारे त्यांच्याविरोधात कारवाई व्हायला हवी; असे रामदास आठवले म्हणाले. ड्रगचा विळखा घातक आहे. ड्रगपासून सर्वांनीच दूर राहावे, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here