मुंबई (हितेश मिस्त्री) – बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी केली. दीपिका आणि तिची माजी मॅनेजर यांची चौकशी पाच तास चालली. ही चौकशी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्सच्या पैलूबाबत करण्यात आली. यातील मुख्य दुवा मानल्या जात असलेल्या मोबाईल फोनकडे एनसीबीचे लक्ष आहे आणि एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत, सिमोना खंबाटा आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे फोन जप्त केले आहेत. या फोनमधील डेटा रिकव्हर करून करण्यात आलेल्या चॅटचा या प्रकरणाशी असलेला संबंध तपासण्यात येईल.
या सर्व फोनमधील डेटा रिकव्हर केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासात ही एक महत्वाची कडी असू शकते कारण या अभिनेत्रींचे व्हॉट्सअॅप चॅट यात फार महत्वपूर्ण आहेत. आता जप्त झालेले फोन तपासून त्यांचा डेटा रिकव्हर करून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.
एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की करिश्मा प्रकाशचे व्हॉट्सअॅप चॅट्स एनसीबीच्या रडारवर आहेत, ज्यात कथित रूपाने ‘डी’ नामक व्यक्तीशी ड्रग्सबद्दल कथित बोलणे झालेले आहे आणि ही व्यक्ती कोण आहे हे एनसीबीला जाणून घ्यायचे आहे. याआधी शनिवारी एनसीबीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मादक पदार्थांच्या पैलूचा तपास करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची साक्ष नोंदवून घेतली. तसेच त्यांनी धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज रवी प्रसादची चौकशीनंतर त्याला ताब्यात घेतले आहे.
श्रद्धा आणि साराची दक्षिण मुंबईतील बलार्ड इस्टेटच्या एनसीबी क्षेत्रीय कार्यालयात चौकशी केली. याआधी अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी एनसीबीच्या कुलाब्यातील अतिथीगृहात झाली आणि आपली साक्ष नोंदवून तिला सोडण्यात आले.
साक्ष नोंदवण्यासाठी श्रद्धा कपूर दुपारी साधारण १२ वाजता तर सारा यानंतर सुमारे तासाभराने एनसीबीच्या क्षेत्रीय कार्यालयात पोहोचली. साधारण साडेचार तास साराची साक्ष नोंदवली गेली आणि संध्याकाळी साडे पाचच्या सुमाराला ती तिथून बाहेर पडली. श्रद्धा सहा तासांच्या चौकशीनंतर साधारण ५ वाजून ५५ मिनिटांनी कार्यालयातून निघाली. या दोन्ही अभिनेत्रींनी सुशांत सिंह राजपूतसोबत चित्रपट केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका पादुकोणची चौकशी तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्यासमोर झाली.
एनसीबीने बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मादक पदार्थांबाबत धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज रवी प्रसादच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. शुक्रवारी रवीला त्याच्या वर्सोवा येथील घरातून सकाळी एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले जिथे त्याची दिवसभर चौकशी झाली. शुक्रवारी एनसीबीने धर्मा प्रोडक्शनच्या अनुभव चोपडाचीही चौकशी केली होती. याआधी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह इतर काही जणांना मादक पदार्थ तस्करीप्रकरणी अटक केली आहे.







