पनवेल (सहसंपादक ॲड.विष्णू गवळी) – भागवताचार्य प्रखर हिंदुत्ववादी ब्राह्मण समाजाचे सर्वेसर्वा सावरकरप्रेमी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष पंढरपूर एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रखर विचारसरणी आपल्या वक्तृत्वातून प्रखरपणे मांडणारे श्री वा ना उत्पात महाराज यांचे कोरोनो आजाराने पुण्यात दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले वंदनीय गुरूंना भावपूर्ण श्रद्धांजली!
भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक होते. ते पंढरपूरचे राहणारे होत. वा. ना. उत्पात हे गेली ३३ वर्ष पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुर्मासात भागवत सांगत . श्रीमदभागवताचा हा अखंड ज्ञानयज्ञ ३३ वर्षे अविरतपणे त्यांच्या हातून सुरू होता. तसेच चातुर्मासात ज्ञानेश्वरी प्रवचनांची परंपरा त्यांनी अनेक वर्षे जोपासली.
ते रुक्मिणी मातेचे वंशपरंपरागत पुजारी होते. 39 वर्षे त्यांनी कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे संस्कृत,मराठी,इंग्रजी, इतिहास या विषयाचे अध्यापन केले.त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात श्रीमदभागवत,रुक्मिणी स्वयंवर,ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह,प्रवचने केली. विविध विषयांवर व्याख्याने देत होते.
पंढरपुरातील समाजकारण,राजकारण या मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे .ते 25 वर्षे नगरसेवक आणि 2 वर्षे नगराध्यक्ष होते.त्यांचे गुरुवर्य श्री वरदानंदभारती म्हणजेच प.पू अनंतरावजी आठवले यांच्या सहवासाने आणि आणि आशीर्वादाने त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात खूप प्रगती केली. गीता,उपनिषदे,संस्कृत वाङमय,इतिहास व सावरकर वाङ्गमय याचे ते गाढे अभ्यासक होते . स्वातंत्र्यवीर सावरकर हा त्यांचा श्वास होता पंढरपूर येथे सावरकरांचा 9 फुटी पूर्णाकृती पुतळा, 1 लाख पुस्तकांचे सावरकर वाचनालय आणि दीड कोटी रु खर्च करून सावरकर क्रांती मंदिर त्यांनी उभे केले आहे आणि त्यासाठी लागणारी सर्व रक्कम ही त्यांनी देणग्या आणि स्वतःच्या कीर्तन प्रवचन आणि व्याख्यानातून जमवले आहेत .क्रांती मंदिराचे काम अजून सुरु असून, त्यानी आत्तापर्यंत 25 पुस्तके लिहिली आहेत आणि शेकडो लेख लिहिले आहेत. वयाच्या ८१व्या वर्षीही त्यांचे लिखाण अविरतपणे सुरू होते.
त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यातील काही म्हणजे ‘देवर्षी नारद पुरस्कार,’ ‘महर्षी याज्ञवल्क्य पुरस्कार’,’आदर्श शिक्षक पुरस्कार, अलिकडेच मिळालेले ‘नानासाहेब पेशवे पुरस्कार’ लावणीचा रामजोशी पुरस्कार व सावरकर प्रतिष्ठान पुणे यांचा जीवनगौरव पुरस्कार अशा शेकडो पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या दुःखद निधन झाले, त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस बुलंद पोलीस टाइम्सतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!







