गदिमांचा भारतरत्न, महाराष्ट्र भुषणने गौरव करण्याची सादिक खाटीक यांची शासनाकडे मागणी
आटपाडी (प्रतिनिधी) – माणदेशी आटपाडी तालुक्यातील जगविख्यात साहित्यीक, मान्यवरांची स्मारके — स्फूर्ती केद्रे माणदेशाची मुख्य ओळख बनवा आणि आधूनिक वाल्मीकी ग. दि.माडगूळकर यांचा भारतरत्न, महाराष्ट्र भूषणने मरणोतर गौरव करावा ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविलेल्या ईमेल पत्राद्वारे केली आहे .
१ ऑक्टोंबर ला गीत रामायणकार, महाकवी ग.दि. माडगूळकर यांची १०१ वी जयंती आहे . त्या पार्श्वभूमीवर या महत्वपूर्ण मागणीच्या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील, उद्योग, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख , सांस्कृतीक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सहकार, मराठी भाषा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना पाठविल्या आहेत .
जन्मशताब्दी वर्षात गदिमांचा भारतरत्न ,महाराष्ट्र भुषणने गौरव केला जावा अशी मागणी आपण पूर्वी केल्याचे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी राज्य शासनाने गदिमांना महाराष्ट्र भुषण जाहीर करून भारतरत्न साठी तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे .जन्मशताब्दी वर्षात आटपाडीतल्या गदिमा नाट्यगृहाच्या वाजलेल्या १३ कोटीच्या चौघड्याला तातडीने सत्वर शुभारंभाचा मुहूर्त सापडावा, अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली .
आटपाडी तालुक्याने जगाला गवसणी घालणारी उतुंग कार्यकर्तृवाची प्रतिभासंपन्न अनेक रत्ने दिली, आटपाडी तालुका मुख्य महाल असलेल्या औंध संस्थानचे अधिपती भवानराव उर्फ बाळासाहेब पंत – प्रतिनिधी, संस्थानचे पंतप्रधान बैरिस्टर कै . आप्पासाहेब पंत प्रतिनिधी , थोर साहित्यीक, ग.दि.माडगूळकर , साहित्यीक व्यंकटेशतात्या माडगूळकर , साहित्यीक शंकरराव खरात , साहित्यीक ना . सं . ईनामदार ( जन्मगांव गोमेवाडी ) साहित्यीक अरुण कृष्णाजी कांबळे, शांताबाई कृष्णाजी कांबळे ( करगणी ) अॅड . नानासाहेब झोडगे( माडगुळे) ,श्री प्रकाश देशपांडे चिपळूण (वलवण ), सुभाष कवडे भिलवडी ( आटपाडी ), प्राचार्य डॉ. श्री .सयाजीराजे मोकाशी ( शेटफळे ),चित्रपट दिग्दर्शक म.गो. तथा बाबा पाठक, माजी केद्रीय मंत्री माजी राज्यपाल श्री . राम नाईक, एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेलचे संपादक श्री . राजीव खाडेकर , प्रा.अंबादास माडगुळकर, बाबाखान दरवेशी ( करगणी ),लावणीसम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपुरकर ( बनपुरी ) , आटपाडी तालुक्याचे शिल्पकार कै. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार कै .आण्णासाहेब लेगरे ,जतचे माजी आमदार अॅड . दिवंगत जयंत सोहनी ( गोमेवाडी ), औंध संस्थानचे मंत्री कै.रस्तुमरावबापू सेना सुभे चव्हाण देशमुख , संस्थानचे माजी मंत्री अमिनुदीन कुरेशी, संस्थानचे माजी आमदार मिठुलाल कलाल , कलाप्रेमी कवी मनाचे शिक्षक नवसरलाल कलाल, स्वतंत्रपूरचे पहिले जेलर अब्दूल अजिज काझी मास्तर ,शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे ह. ग. देशमुख, रंगलाल कलाल , भा. दि . माडगूळकर , आकाशवाणीवर गाजलेले कृष्णराव सपाटे, जागतिक किर्तीचे मल्ल वस्ताद पैलवान श्री .नामदेव बडरे , शास्त्रज्ञ डॉ. दीपक पिंजारी , इत्यादी अनेक जागतिक स्तरावर चमकलेले शास्त्रज्ञ ,डॉक्टर, उच्च पदस्थ अधिकारी ,प्रज्ञावंत , कलाकार, राजकारणी , मान्यवर महोदयांची जननी , कर्मभूमी आटपाडी तालुका आहे .
आटपाडी तालुक्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असणाऱ्या पाच मान्यवर साहित्यीकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले आहे .थोर साहित्यीक , कलाकार , प्रज्ञावंतांची जननी असलेल्या आटपाडी तालुक्यातील साहित्यीकांची, मान्यवरांची, साहित्य, कला व इतर क्षेत्रातील कामगिरी उत्तुंग आहे . दिवंगतांची स्मृती चिरंतन जतन व्हावी, तसेच आजही कार्यरत असणाऱ्यांचे महात्म सर्वांना एका छताखाली समजावे , नव साहित्यीक , साहित्यप्रेमींना प्रेरणा मिळावी , आटपाडी तालुक्याचे हे वैभव टिकावे यासाठी या साहित्यिकांची, प्रज्ञावंताची स्मारके – स्फुर्ती केद्रे त्यांच्या जन्मभूमी , कर्मभूमीत उभारणे अत्यंत गरजेचे आहे .
माडगूळे येथे २५ कोटी रूपये खर्चुन ग . दि .माडगूळकर आणि व्यंकटेशतात्या माडगूळकर या बंधूचे संयूक्त स्मारक उभे केले जावे,आटपाडी येथे १५ कोटी रुपये खर्चाचे शंकरराव खरात यांचे आणि गोमेवाडी येथे १५ कोटी रूपये खर्चाचे ना . सं इनामदार यांचे स्मारक उभारले जावे . ३५ वषापासून मागणी असलेले गदिमांच्या जन्मगांव शेटफळे च्या स्मारकाची १ कोटीच्या आत बोळवण करून उभारलेले स्मारक आणखी १५ कोटी रुपये खर्चून या स्मारकाला नवे आयाम दिले जावे .
औंध संस्थानचे पंतप्रतिनिधी पितापुत्र, दिग्गज साहित्यीक, प्रज्ञावंत ,कलाकार , विविध क्षेत्रात मोठा ठसा उमटविलेले मान्यवर, राजकारणी यांची स्मृती चिरंतन ठेवणारे, सध्याही कार्यरत असलेल्या मान्यवरांचे महात्म्य अधोरेखित करणाऱ्या सर्वांचे ” स्मारक – स्फुर्तीकेंद्र ” आटपाडी या केंद्रस्थानी ५० कोटी रुपये खर्चून साकारावे .
या सर्व स्मारक, स्फूर्ती केंद्रामध्ये मध्ये ५०० आसन क्षमतेचे सांस्कृतीक भवन व्हावे , ग्रंथालय , अभ्यासिका , मोफत वाचनालय केले जावे , यामध्ये साहित्यीकांचे समग्र साहित्य , ग्रंथसंपदा असावी , पर्यटकांसाठी शासकीय विश्रामगृह , शिशु विहार , बलो उदयान व सावलीचे घडयाळ करणेत यावे, वनस्पती शास्त्र युक्त प्रशस्त बाग असावी, लहान मुलांसाठी बागेत एका बाजुस पोहण्याचा तलाव , खेळांसाठी क्रिडांगण असावे, ही स्मारके – स्फूर्ती केंद्रे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करावीत , वृंदावन गार्डनच्या धर्तीवर सर्वच्या सर्व स्मारकांमध्ये ग . दि . माडगूळकर यांच्या गितांच्या रोषणाईचा नेत्रोत्सव असावा , माणदेशातील लोककलांचे ,लोकगीतांचे कलादालन सर्व स्मारकांचे आकर्षण ठरावे .
आटपाडी — माडगुळे, आटपाडी — शेटफळे आणि उंबरगांव — आटपाडी– भिवघाट या ३ मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उंच आणि भव्य अशा संगमरवरी फरशांच्या ५६ होर्डींग्ज वर गदिमांच्या गीत रामायणातील अजरामर ५६ गीते चितारूण गदिमांच्या परमेश्वरी प्रतिभेला वंदन केले जावे . गदिमा जन्मभूमी,कर्मभूमी मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आटपाडीतून माडगूळे, शेटफळेला जाताना संथ गतीने अथवा चालत जाण्याचा मोह व्हावा . इतक्या सुंदरतेने हे रस्ते गीत रामायणाच्या पवित्र गीतांनी भारले जावेत .







