फैजपूर (प्रतिनिधी राजु तडवी) – राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन दुसरी बुद्धिमत्ता चाचणी परक्षेची तारीख जाहीर करावी या मागणीसाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फैजपूर उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत निवेदन देण्यात आले.
शालेय शिक्षण विभागाच्या २०१७ च्या शासन निर्णयानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था व इतर संस्थांमधील शिक्षण सेवक पदभरती करिता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०१७ घेण्यात आली आणि १२१४७ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यात उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची दोन्ही निवड याद्यांमध्ये एकूण ४४६ पदे भरण्यात आली होती.परंतु चालू शैक्षणिक वर्षात कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असल्याने वित्तीय उपाययोजना करण्यासाठी वित्त विभागाकडून राज्यात ०४ मे २०२० रोजी पदभरती वर बंदी घालण्यात आली आहे.या रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन कमीत कमी निवड याद्या प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी द्यावी आणि दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ व साजिद निसार अहमद सर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार रशिद तडवी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अय्याज शेख, मुजाहिद काझी, साद तडवी, शोएब खान, सय्यद बिलाल उपस्थित होते.







