मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – महात्मा गांधी जयंती निमित्त जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने शंकर नारायण महाविद्यालय भाईंदर जिल्हा पालघर येथील गांधी स्टडी सेंटर आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी आणि आजचा भारत या विषयावर ऑनलाईन वेबिणारचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते, सदस्य सद्भावना संघ, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास म्हणाले की, या स्पर्धेत जगाची शांतताच धोक्यात येवून सामान्यांचे जीवन धोक्यात येते. प्रत्येकच जीव महत्त्वाचा, म्हणूनच महात्माजींनी अहिंसा मार्गाने समोरच्या व्यक्तीच्या अंतरात्म्याला विवेक जागृतीची साद घालण्याचा मार्ग अवलंबला. शत्रू बुद्धी विनाशाचा प्रयत्न केला. सत्याचा आग्रह धरुन जगात प्रथमच सत्याग्रह, असहकार. उपोषणास्त्र हे नवे मार्ग आरंभले. लोकांवरही त्यांचा एवढा प्रभाव होता की ब्रिटिशांचा मार खात अन्याय सहन करुनही ते प्रतिकारासाठी हिंसेकडे वळले नाहीत. हिंसा मग शब्दाची असो वा शस्त्राची त्याने कधीच प्रश्न न सुटता ते वाढतातच.
गांधीनी स्वावलंबन शिकवले. सुतकताईने ते आणि लाखो लोक स्वतः चे कपडे शिवू लागले. या बॅरीस्टरांनी स्वातंत्र्य आंदोलनात सत्य, अहिंसा तत्व पाळले. जातीभेद निर्मुल अस्पृश्यता निवारणासाठी मोठे कार्य केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आदेशाने लाखो लोक संसार सोडून निशस्त्रपणे मार खात, हालअपेष्टांचा सामना करत अनिश्चित तुरुंगवासही बिनदिक्कत भोगायचे.गांधीजीनी स्त्रीयांना बरोबरीचे स्थान देत चळवळीत आणले. शेतकरी गरीबांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. व्यसनमुक्ती, स्वच्छचेचा मंत्र देशाला दिला. देशाच्या जगाच्या शांततामय मानवी जीवनासाठी स्वतः च्या जीवनाने धडा देणारे गांधीजी आईनस्टाईनला अविश्वसनीय हाडामासाचे मानव वाटायचे. लालबहादूर शास्त्री. हे गांधीचेच अनुयायी. तशीच साधी वागणूक प्रामाणिकता निस्पृहता त्यागी वृत्ती. ते पंतप्रधान होताच त्यांनी अन्नटंचाईच्या काळात देशाला आठवड्यात एका सांजेला उपवास करा आवाहन केले. लाखो लोक उपवास करू लागले. एवढा मोठा प्रभाव असणारे हे आदर्श असे नेतृत्व.
त्यांच्या “जय जवान जय किसान !” या नाऱ्याने देशात इतिहास घडला. तर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील म्हणाले, जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचे सर्वधर्म समभाव, विश्र्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, पर्यावरण, व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा या बहुविध विषयांवरील विचार आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक आहेत. तसेच या वेबिणारमध्ये कॉलेजचे १०० विद्यार्थी व २३ प्राध्यापकानी सहभाग घेतला. शंकर नारायण महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. यादव सर, गांधी स्टडी सेंटरचे प्रमुख सौ. प्रा. डॉ. शितल रसाळ आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे मुंबई जिल्हा संघटक सौ. दिशा कळंबे मॅडम उपस्थित होते.







