ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे)
जगभरात नावलौकिक असलेल्या मुंबई क्राइम ब्रँचचे सहपोलीस आयुक्त म्हणून मिलिंद भारंबे यांनी महिनाभरापूर्वी सूत्रे हाती घेतली आणि मुंबई डिटेक्शन क्राइम बँचमधील बहुसंख्य युनिट इन्चार्ज सक्रिय झाले असून भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली चोर, लफंग्यांच्या, सराईत व फरार गुंडांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. मिलिंद भारंबे हा अत्यंत मनमिळावू लोकांसाठी, पोलिसांसाठी तळमळीने काम करणारा एक सच्चा दिलाचा प्रामाणिक आयपीएस अधिकारी आहे. या अधिकाऱयामध्ये बेगडीपणाचा लवलेशही नाही. प्रसिद्धीपासून दूर असणाऱया अशा अधिकाऱयाची मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करीत होते. अखेर त्यांच्या गुणवत्तेला, बुद्धिचार्तुयाला, तसेच क्राइम बँचच्या अधिकाऱयांना उशिरा का होईना न्याय मिळाला. पोलिसांना हवे तसे एक दिलखुलास विश्वसनीय नेतृत्व लाभले. त्यांच्यासमोर सध्या टीआरपी घोटाळय़ाच्या अगदी मुळापर्यंत जाण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मुंबई गुन्हे शाखा म्हणजे मुंबई पोलीस दलाची एक शान आहे. या शाखेतील अधिकाऱयांनीच मुंबईतील गँगवॉर संपविले, अतिरेक्यांच्या नांग्या ठेचल्या. त्यामुळेच आज मुंबईत शांतता आहे. शूटआऊट थांबले आहेत. 800 च्या वर संघटित गुंडांचा, 10 शीख व 16 इस्लामी अतिरेक्यांचा चकमकीत खात्मा केल्यावर आता कुणाची हिंमत होईल रक्तपात घडविण्याची? मुंबई डिटेक्शन क्राइम ब्रँचच्या पूर्वीच्या अधिकाऱयांनी धाडसी कारवाई केल्यामुळेच आज मुंबईकर निर्भयपणे रात्री-अपरात्री रस्त्यावरून फिरत आहेत. त्याचे श्रेय नक्कीच मुंबई क्राइम ब्रँचला द्यावे लागेल. यापूर्वी अरविंद इनामदार, आर. डी. त्यागी, एम. एन. सिंग, रणजित शर्मा, डी. शिवानंदन, भुजंगराव मोहिते, श्रीधर वगळ, डॉ. सत्यपाल सिंग, श्रीमती मीरा बोरवणकर, राकेश मारिया, हिमांशू रॉय, सदानंद दाते, अतुलचंद्र कुलकर्णी, संजय सक्सेना, आशुतोष ठुंबरे, संतोष रस्तोगी यांनी मुंबई क्राइम ब्रँचचे सहपोलीस आयुक्त म्हणून धुरा वाहिली आहे. त्यातील बहुसंख्य अधिकाऱयांनी क्राइम ब्रँचला वाहून घेतले होते. केसेस डिक्टेट करण्यासाठी, गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी अविरत प्रयत्न केले होते, परंतु दोन-तीन दशकांपूर्वीचा हा काळ आता संपला आहे. गँगवॉर व अतिरेकी कारवाया थंडावल्या आहेत, आता स्ट्रीट क्राइमपेक्षा चीटिंग वाढली आहे. सायबर माफियांनी, समाजकंटकांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मिलिंद भारंबे यांनी याची गंभीर दखल घेतली असून चोर, लफंगे व सायबर माफियांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश आपल्या सहकाऱयांना दिले आहेत. त्याप्रमाणे मुंबई डिटेक्शन क्राइम ब्रँचचे प्रत्येक युनिट कामाला लागले आहे. आपल्या परिसरातील वॉण्टेड गुंडांचा, फसवणूक करणाऱया लफंग्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पूर्वी दहा टक्के कोटय़ातील सरकारी किंवा दोन टक्के कोटय़ातील म्हाडाचे स्वस्तात घर मिळवून देतो असे भासवून लोकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक केली जायची. आता दहा टक्के कोटय़ातील घरांची सवलत बंद झाली आहे. त्यामुळे आता बँकेचे हप्ते थकल्याने जप्त केलेली घरे स्वस्तात देतो असे सांगून मोठय़ा प्रमाणात गरीब व गरजूंना फसविले जात आहे. याबाबतच्या तक्रारी बोरिवली (पश्चिम) येथील एमएचबी पोलीस ठाण्यात नोंदविल्या गेल्या असून याचा तपास मुंबई क्राइम ब्रँच युनिट क्र. 12 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्याकडे सोपविण्यात आला. महेश तावडे व त्यांच्या सहकाऱयांनी व वरिष्ठांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला व अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मीरा रोड, वसई व विरार आदी परिसरांत मालकाची परवानगी न घेता इस्टेट एजंटच्या मदतीने रिकामी फ्लॅट गिऱहाईकांना दाखविणाऱया भामटय़ांविरुद्ध फिल्डिंग लावली व गरीब व गरजूंना फसविणाऱया सचिन विलास बोरडे (30) या आरोपीला अटक करून त्याच्या कार्यपद्धतीचा बुरखा फाडला. सचिन बोरडे हा एका टोळीचा प्रमुख असून ही टोळी बँकेची बनावट कागदपत्रे व स्टॅम्प बनवून बंद असलेले फ्लॅट बँकेचे असल्याचे भासवते. घर स्वस्तात मिळणार म्हटल्यावर कर्ज काढून व आपल्याकडील दागिने विकून सुमारे दोन डझन गरीब व गरजू लोकांनी सचिन बोरडेला पैसे दिले आहेत. कोणी दहा, कोणी पंधरा, कोणी वीस लाख अशी रक्कम सचिन बोरडे व त्याच्या साथीदारांना दिली व आपली फसवणूक करून घेतली आहे. अशा भामटय़ांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. महेश तावडे व त्यांच्या सहकाऱयांनी सचिन बोरडेला गजाआड केले. त्याचदरम्यान कोविड रुग्णालयात प्रवेश करून रुग्णांच्या नातेवाईकांच्या जवळील (ते आवारात झोपले असताना) रोकड व किमती वस्तू पळविणाऱया आसिफ पठाण (30) या भामटय़ास अटक करण्यात दहिसर क्राइम ब्रँच युनिटला यश आले. कोणाची तरी रिक्षा चोरून हा भामटा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना लुटायचा. त्यामुळे लोकांनी आता रुग्णालयातही सावध राहणे आवश्यक आहे.
मिलिंद भारंबे यांनी जॉइंट सीपी (क्राइम) म्हणून चार्ज घेतल्यानंतर कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने व त्यांचे सहकारीही चार्ज झाले. यूपी पोलिसांना गेल्या वर्षभरापासून वॉण्टेड असलेल्या व त्याला पकडून देणाऱयास 2 लाख 50 हजार रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते. अशा फरार खतरनाक प्रवीण ऊर्फ आशु ऊर्फ आकाश राजेंद्र सिंग (32) या आरोपीस मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून अटक करण्यात सुनील माने व त्यांच्या सहकाऱयांना यश आले. हा आरोपी मुंबईत फेरीवाल्याचा व्यवसाय करीत होता. या खतरनाक गुंडाने एका भाजप नेत्याची व एका बडय़ा उद्योगपतीची हत्या केली होती. मिर्ची गँगचा प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱया या गुंडाची काझिपुरा मसुरी भागात प्रचंड दहशत होती. महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणे, प्रसंगी हत्या करणे आदी 40 ते 50 गंभीर गुह्यांची उत्तर प्रदेशात नोंद असलेल्या या आरोपीला मुंबई क्राइम ब्रँचने उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तेव्हा परप्रांतातील गुंड आज मुंबईत आश्रय घेत आहेत, फेरीवाल्याचा व्यवसाय करीत आहेत. यावर आता कटाक्षाने लक्ष ठेवण्याची गरज आहे हे दिसून येते. त्यामुळे मुंबई क्राइम ब्रँचची जबाबदारी आता वाढली आहे एवढे नक्की. मिलिंद भारंबे यांच्यासमोर सध्या हजारो कोटी रुपयांच्या टीआरपी घोटाळय़ाचे आव्हानही उभे आहे. या घोटाळय़ामागची बडी धेंडं टूजी-थ्रीजी स्पेक्ट्रम घोटाळय़ाप्रमाणे जेलमध्ये जातील का? मुंबई क्राइम ब्रँच कमालीची सक्रिय झाली आहे. खोलात गेल्यास बरेच काही बाहेर येईल. महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी परदेशात उघडण्यात आलेल्या 80 हजार ‘फेक’ अकाऊंटचाही उलगडा होईल.







