बहाडोलीची तनिष्का किणी दांडेकर महाविद्यालयात विज्ञानात प्रथम

तनिष्का किणी

पनवेल (जिल्हा क्राइम रिपोर्टर रामदास पाटील) | जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर पालघर तालुक्यातील बहाडोली गावातील कु. तनिष्का प्रकाश किणी हिने बारावीच्या निकालात यशाचे शिखर गाठले आहे. पालघर येथील नामांकित सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातून तनिष्काने विज्ञान शाखेत ९०.००% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

 

तनिष्काच्या या यशामागे तिचे वर्षभराचे नियोजनबद्ध कष्ट आणि सातत्यपूर्ण अभ्यास असल्याचे बोलले जात आहे. तिने केवळ परीक्षेत गुण मिळवले नाहीत, तर शिस्त आणि अभ्यासातील समर्पणाचा एक आदर्श समोर ठेवला आहे. ‘स्वतःवर असलेला विश्वास आणि पालकांचे पाठबळ यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले’, अशी भावना तनिष्काने व्यक्त केली आहे.

तनिष्काने मिळवलेल्या या यशामुळे तिच्या आई-वडिलांसह संपूर्ण बहाडोली गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. आपल्या लेकीचे हे यश पाहून किणी परिवारात आनंदाला उधाण आले असून, सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षण क्षेत्रात घेतलेली ही झेप अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

तनिष्काचे हे यश तिच्या करिअरमधील पहिली मोठी पायरी मानली जात आहे. पुढील शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी तिला ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या निकालामुळे बहाडोली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here