“बलात्कार..कीतीतरी भयानक वास्तव लपलेला शब्द. का होतो बलात्कार कशासाठी होतो बलात्कार ? काहीच आणि कशासाठी हे समजत नाहीना! ज्यावेळेला एखादी स्त्री पुरुषाच्या वासनेला, त्याच्या कामंधपणाला बळी पडते त्यावेळेला बलात्कार होत असतो. ज्यावेळेला एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध तिच्या शरीराशी संग केला जातो त्यावेळेला बलात्कार होत असतो. बलात्कार म्हणजे बलाचा वापर करून केलेली जबरदस्तीने संभोगवृत्ती.. हा बलात्कार ज्यावेळेला तिच्या मनाविरुद्ध होत असतो त्यावेळेला केवळ तिच्या शरीरावर नाही तर तिच्या मनावर जखमा होत असतात. स्त्री ही खरोखर सुरक्षित आहे काय ? समाजात आज स्त्रीवर वेगवेगळे अत्याचार होताना बघतो. खरंच आज स्त्री, पुरुषा प्रमाणे समाजात मोकळी, बिनधास्त राहू शकते का ?
हिंसक वृत्तीचा पुरुष बलात्कार करताना वयाचा विचार करत नाही. मग ती तरुणी असो, वयस्कर बाई असो वा पाच वर्षांची चिमुरडी असो! बलात्काराच्या अनेक घटना आपण सध्या बघत आहोत. समाजात सामूहिक बलात्काराच्या घटना वाढत आहेत. त्यात अल्पवयीन मुली॓ची संख्या वाढत आहे. चिमुरड्यांवर झालेल्या बलात्काराच्या घटना समाजाला अतिशय घृणास्पद, प्रक्षोभक आहेत. हा प्रश्न सामाजिक गांभीर्याचा आहे. हा प्रश्न समाज जागृतीचा बनला आहे. साधारणपणे याची मानसिकता समजून घ्यायला हवी.
दुर्दैवानं जगात कुठलीच न्याय प्रणाली किवां कोणताही समाज बलात्काराला थांबवू शकलेला नाही. धार्मिक पातळीवर, आर्थिक पातळीवर, जातीनिहाय अगदी अर्थनिधी मध्ये सुद्धा बलात्कारावर कोणतेही उपाय नाही. कारण बलात्कार होण्याच्या अगोदरची परिस्थिती हि पुरुषाच्या मेंदूमध्ये वाहणाऱ्या सम्प्रेरकांमध्ये म्हणजेच हार्मोन्स वर अवलंबुन असते. मानसशास्त्रज्ञांचे असे मत आहे की, बलात्काराची पे्रणा लैंगिक नसून, त्यात श्रेष्ठत्वाचा आणि वर्चस्वाचा भाग अधिक प्रमाणात असतो. दुसर्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा आणि त्यावर अधिकार गाजवण्याचा विचार हा पुरुषी हिंसक प्रवृत्तीला बळी ठरतो.
आयुष्याच्या कुठल्या वळणावर पुरुष हा हिंसक पशू झाला, पुरुषांच्या हिंसक वर्तणुकीशी कोणकोणते घटक जोडलेले असतात; ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न करायला हवा. कोणत्या प्रसंगाने त्याच्या मनावर हे बिंबविले की स्त्री ही एक वस्तू आहे, कोणत्या प्रसंगाने त्याच्यामधे हीन भावना आली? देशातील प्रत्येक नागरिकाने शांतपणे आणि सामंजस्यपणाने या प्रवृत्तीचा विचार करायला हवा. यावर तोडगा काढायला हवा.
अहमदनगर जिल्ह्यातील, कोपर्डी गावी ३ विकृत व्यक्तींद्वारा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. २००४ सालीदेखील धनंजय चटर्जी नावाच्या माणसाला एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि खून करण्याबद्दल फाशी झाली होती २८ नोव्हेंबर रोजी पशूवैद्यक म्हणून काम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीला हैदराबादमध्ये बलात्कार करून जिवंत जाळण्यात आलं होतं , दिल्लीत १६ डिसेंबर रोजी घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या खटल्यात चौघांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली तेव्हा बलात्काराला बळी पडलेल्या त्या मुलीला खरा न्याय मिळाला, असे अनेकाना मनापासून वाटत होते. या कडक शिक्षेमुळे आता यापुढे असे गुन्हे करू पाहणाऱ्यांना चांगली जरब बसेल अशीही बऱ्याच जणांची समजूत आहे. परंतु तसे झाले नाही.
हाथरस ,यू .पी येथे पुन्हा एकदा १९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार,करून तिची निर्घृण हत्य्या करण्यात आल्यामुळे आज पुन्हा एकदा साऱ्या स्त्रियांच्या हृदयाचे ठोके चूकले आणि पुन्हा एकदा सारा देश हादरला . बलात्कार झालेल्या स्रीला जीवानिशी मारण्याचे अनेक प्रकार आता आपण बघत आहोत.
एका शिक्षेमुळे समाजातून बलात्कार नाहीसा होणार नाही तर त्यासाठी आपल्या समाजात जे बलात्काराला पोषक वातावरण तयार झालेले आहे, ते नाहीसे केले पाहिजे.अशा सर्व घटनांचा विचार करता, बलात्कार का होतात आणि बलात्कार करण्यामागची पुरुषांची मानसिकता काय असते, याचा विचार करण्याची तसंच ती मानसिकता बदलण्याची गरज आहे.
आजपर्यंत कानावर पडलेल्या घटनांमधून आपल्या हे लक्षात आले आहे की, बलात्कार हे फक्त अनोळखी, विकृत लोकांकडून होतात किंवा एकटे असताना, निर्जन ठिकाणी असताना होतात, असं नाही. अनेक बलात्कार हे विश्वासातल्या व्यक्तींकडून घराच्या चार भिंतीत, शाळांमध्ये, अगदी धार्मिक ठिकाणी देखील होत असतात. बलात्कार हे इतर मार्गांनी लैंगिक भूक शमवता येत नाही म्हणून होत नसतात, तर ते समस्त स्त्री वर्गाला धाकात, जरबेत ठेवण्यासाठी केले जातात. स्त्रीने प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर तिला धडा शिकवण्यासाठी होतात. एका सर्वे मध्ये एका बलात्काराची शिक्षा झालेल्या कैद्याला तुरुंगात विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले कि बलात्कार करताना तिच्या चेहऱ्यावरचे भीतीचे हावभाव पाहण्यात मज्जा वाटते म्हणून आम्ही बलात्कार करतो.
सुझान ब्राऊनमिलर या प्रसिद्ध स्त्री चळवळीच्या कार्यकर्तीच्या ‘Against our will’ या अत्यंत गाजलेल्या पुस्तकात त्या म्हणतात , “Rape is nothing more or less than a process of intimidation by men to keep all women in a state of fear.” (पुरुषांनी समस्त स्त्रीवर्गाला सतत दहशतीत ठेवण्यासाठी अंगीकारलेली एक प्रक्रिया म्हणजे बलात्कार.)
हत्तीच्या पिल्लाला अगदी लहानपणापासून जाड साखळ दंड लावून कायम बांधून ठेवतात. ते लहान असताना साखळदंड तोडू शकत नाही, पण पुढे तो मोठा हत्ती झाल्यावर आणि साखळदंड सहज तोडू शकेल असं सामर्थ्य आल्यावरही तो ते साखळदंड तोडू शकत नाही. कारण त्याने आत्मविश्वास गमावलेला असतो. स्त्रियांची इतक्या हजारो वर्षांच्या गुलामीने अशीच काहीशी अवस्था आज झालेली आहे. मर्यादा फक्त स्त्रियांच्या आचारविचारावर नाही, ती त्यांच्या मनात भिनवली गेलेली आहे आणि पुरुषांच्यासुद्धा. त्यामुळे त्यातून मुक्ततेची गरज आहे.
बलात्काराची भीती बसणे किवा बलात्कार होऊ नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो परंतु बलात्कार होणारच नाही याची आपण शास्वती देऊ शकत नाही नुकतच मध्ये सांगण्यात आलं कि वीर्य सापडलं नसेल तर तो बलात्कार ठरला जात नाही .अशा अनेक पळवाटा म्हणा किव्हा त्याच्यातून अनेक चोर मार्ग हे निघत असतात. अर्थातच याच्यावरती सुद्धा अभ्यास झालाच पाहिजे.
डॉ . बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान विश्वातील सर्वात उत्तम, प्रदिर्घ आणि अनेक विचारांती केलेलं संविधान आहे. या संविधानाचा आदर राखत आपण बलात्काराची शिक्षा आणि बलात्काराची कारणं शोधली पाहिजेत, ज्यावेळेला आपण बलात्काराची कारण शोधू त्यावेळेला शिक्षेबद्दल आपण ठरवू शकतो. आज सर्वोच पदावर बसलेली व्यक्ती म्हणजेच भारताचे राष्ट्रपती यांना फक्त दयेचा अर्ज करता येतो .अशा या फाशीची शिक्षा असणाऱ्या बलात्काराच्या बाबतीत तो होऊ नये यांच्या साठीच आपण प्रयत्न केले पाहिजेत काय करू शकतो आपण याच्यासाठी प्रयत्न ? तर प्रयत्न आपण स्वतः केले पाहिजेत. आपल्या जवळची स्री हि नाजूक आहे, संवेदनशील आहे, हा विचारच सोडून दिला पाहिजे. तिला कणखर बनवलं पाहिजे तिला सक्षम बनवलं पाहिजे ,तिला पुरुषांसारखं राकट बनवलं पाहिजे. आपण महाराष्ट्राचं वर्णन किती छान करतो ” राकट देशा कणखर देशा आता अशाच पद्धतीने आपल्याला या स्त्रीला बनवावं लागणार आहे. स्त्रीचे हात हे नाजूक असतात हे बांगड्या घालण्यासाठी परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे कि स्रियांचे हे हात सौभाग्य लेण्यांनी नटलेलं असलं तरी आपण त्यांच्या मनगटांमध्ये शक्ती निर्माण केली आणि हीच शक्ती ज्यावेळेला आपण निर्माण करू त्यावेळेलाच पुरुषांना आळा बसू शकेल. बलात्कार हा शब्द आपण अतिशय सहजगतीने वापरतो.परंतु अतिप्रसंग हा त्याच्यासाठी अत्यन्त चांगला शब्द आहे.
देवाच्या कृपेने आपण अनेक वेळेला म्हणतो परंतु देव स्वरूपात “सिंहावरी बैसोनी” हि जी देवी आपण पुरतो आहे तिला सिंहा चे दात पाडणारी एक सशक्त स्री बनवली तरच आपल्या देशातले बलात्काराचे प्रमाण कमी होईल.
स्त्रियांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर मुली-स्त्रियांना सर्व दृष्टीने सक्षम होण्यासाठी, निर्भयपणे वावरता येण्यासाठी वातावरण तयार करावे लागेल आणि पुरुषप्रधान मानसिकता बदलावी लागेल.
आज जे गुन्हेगार आहेत त्यांच्याबाबत कसलाही दयाभाव न दाखवता त्यांना कठोर शासन ताबडतोब केले पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन समाज प्रबोधन करायला हवे. बलात्कार करण्या मागची पुरुषांची मानसिकता काय असते, याचा विचार करण्याची तसंच ती मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे .
– सौ. प्रमिला श. जाधव (कुलाबा)







