मुंबई (विशेष प्रतिनिधी) – सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या इमारतींच्या प्रकल्पासंबंधित आराखडे, प्रस्ताव तयार करणे आणि वास्तूशास्त्रीयबाबींमध्ये सल्ला देणारे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ हे पद मागील पाच वर्षांपासून रिक्त आहे. या पाच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य वास्तूशास्त्रज्ञाचा गाडा प्रभारी हाकत असल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे .विविध पदांची माहिती मागितली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना कळविले की, १६ जून २००५ पासून आजपर्यंत मुख्य वास्तूशास्त्रज्ञ पद रिक्त आहे. मागील पाच वर्षात या पदावर एकूण ६ वेळा मुख्य वास्तशास्त्रज्ञाची जबाबदारी प्रभारीने सांभाळली आहे.
या पाच वर्षात दोन वेळा मुख्य अभियंत्यांनाच हा प्रभार देण्यात आला होता. दोन वेळा उपमुख्य वास्तूशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यांनाही दोन वेळा प्रभार देण्यात आला होता. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ पद भरावयाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. तांत्रिक पदे भरावयाची जबाबदारी मुख्य वास्तूशास्त्रज्ञ आणि अधीक्षक अभियंता यांची असते.
ही आहे रिक्त पदे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वास्तूशास्त्रज्ञ विभागात अजूनही रिक्त पदे असून, यात २ वरिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ, ८ वास्तूशास्त्रज्ञ, १३ कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ, ५ सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ ही महत्वाची पदे रिक्त आहे. याशिवाय ४ वरिष्ठ लिपीक, ४ कनिष्ठ लिपीक, १ दप्तरी, १ लोहमुद्रक आणि २ शिपायांची पदेही रिक्त आहेत. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून मुख्य वास्तूशास्त्रज्ञ या महत्त्वाच्या पदावर कायमस्वरुपी सक्षम व योग्य अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. ज्या राज्यात मुख्य वास्तूशास्त्रज्ञ नसेल तर गुणवत्तापूर्ण कामाची हमी कोण देईल? असा सवालही गलगली यांनी शासनाला विचारला आहे.
https://www.facebook.com/764999096874209/videos/347659416678591/?t=4







