नाशिक (विशेष प्रतिनिधी) – राज्यात अतिवृष्टी होत असून नुकसान झालेल्या पकांची हेक्टरी ५० हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून कापणीला आलेली पिके नष्ट झाली आहेत. पुर्ण हंगाम कष्ट व खर्च करुन हाताशी आलेली पिके खराब झालेली, वाहुन जाताना शेतकर्यांना पहावे लागत आहे. केलेला खर्च वाया गेला आहे. घेतलेले कर्ज कसे फेडयाचे व वर्षभर प्रपंच कसा चालवायचा हा प्रश्न शेतकर्यांच्या समोर आहे.
नैसर्गिक आपत्तीत शेतकर्यांना सहाय्य करणे ही सरकारची जवाबदारी आहे. जनतेला स्वस्त अन्न धान्य मिळावे म्हणुन सरकार दर नियंत्रित करून शेतकर्याकडे बचत शिल्लक राहू देत नाही म्हणुन सरकारने शेतकर्यांना आर्थिक सहाय्य करणे आवश्यक आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल मागवून नुकसानीचा अंदाज घेण्या ऐवजी सॅटेलाईट सर्वे किंवा ड्रोन सर्व्हे करुन नुकसानीचा मुल्यांकन करण्यात यावे. नुकसान ग्रस्त भागातील शेतकर्यांना सरसकट नुकसान देण्यात यावी अशी सुचना शेतकरी संघटनेने निवेदनात केली आहे.
एका हंगामी पिकाला शेतकरी सरासरी १५ हजार रुपये खर्च करत असतो व किमान ५ हजार रुपये त्याला प्रपंच चालवायला गरजेचे आहेत म्हणुन केंद्र व राज्य सरकारने मिळुन शेतकर्यांना एकरी २० हजार रुपये म्हणजे हेक्टरी ५० हजार रुपयांचे अर्थ सहाय्य करावे. फळबाग नुकसानीची भरपाई किमान एक लाख रुपये हेक्टरी देण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांना पाठवण्यात आली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी पत्रकारांना दिली आहे.
नुकसान भरपाईतील ५० टक्के वाटा केंद्र सरकारने उचलावा – कुबेर जाधव
विदर्भ मराठवाड्यासह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाआहे, त्याचा फटका सर्वच पिंकाना बसला असुन ऐन काढणीला आलेले सोयाबीन ,कापुस ,मका बाजरी ज्वार इत्यादी पिके धो धो पडणाऱ्या पावसाने खराब झाले आहेत. त्यांना ओलाव्याने कोंब फुटले आहे. उत्तर महाराष्ट्रात लाल कांद्याची लागवडीचे या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने संपूर्ण कांद्याचे पीक व उन्हाळ कांद्याची रोपे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तरी याबाबत मुख्यमंत्री, महसूलमंत्री व कृषीमंत्री यांनी जातीने लक्ष घालून बळीराजाचे अश्रू पुसावे. सरसकट पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी. यासाठी ५० टक्के वाटा केंद्र सरकारने उचलावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केले आहे.







