मिथुन चक्रवर्तीच्या मुलासह पत्नीविरुद्ध गुन्हा

mithun

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार करून गर्भपात करण्यास प्रवृत्त करून धमकी दिल्याप्रकरणी एका 38 वर्षांच्या सिनेअभिनेत्रीच्या तक्रारीवरून बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय मिथुन चक्रवर्ती आणि पत्नी योगिता बाली यांच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्कार, गर्भपातासह अन्य भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

 

 

 

दिल्ली न्यायालयाच्या आदेशानंतर दोन वर्षांनी हा गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यात लवकरच महाक्षय आणि योगिता बाली यांची चौकशी करून जबानी नोंदविली जाणार आहे. 38 वर्षांची ही पीडित अभिनेत्री मूळची गुजरातची रहिवासी असून तिथेच तिथे बीकॉमपर्यंत शिक्षण झाले आहे, तिने आतापर्यंत एक हजारांहून डान्स शोमध्ये भाग घेतला आहे, त्यानंतर तिला भोजपुरी चित्रपटाची ऑफर आली होती. तिने अनेक भोजपुरी, हिंदी, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांत काम केले आहे. पाच वर्षांपूर्वी तिची ओळख मिथुन चक्रवर्ती याचा अभिनेता मुलगा महाक्षय याच्याशी झाली होती, या ओळखीतून ते दोघेही चांगले मित्र झाले होते, काही महिने ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.

 

 

 

 

 

महाक्षय हा अंधेरीतील ओशिवरा, यमुनानगरच्या लष्करिया इमारतीमध्ये राहात असल्याने त्याने तिला मे 2015 साली त्याच्या घरी बोलाविले होते. तिथे त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. शुद्धीवर आल्यानंतर तिला हा प्रकार समजताच त्याने प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करून तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले, तिला लग्नाचे आमिष दाखवून सलग तीन वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता, त्यातून ती गरोदर राहिली होती, ही माहिती समजताच त्याने तिला गर्भपात करण्यात प्रवृत्त केले, तसेच आई योगिता बाली हिने तिला धमकी दिली होती.

 

 

 

तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहूनही महाक्षयने तिच्याशी विवाह केला नाही, विवाहाविषयी विचारणा केल्यानंतर तो तिला सतत टाळत होता, त्यामुळे तिने दिल्लीतील स्थानिक न्यायालयात योगिता बाली आणि महाक्षय चक्रवर्ती यांच्याविरुद्ध एक याचिका दाखल करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची विनंती केली होती, या याचिकेनंतर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशीचे आदेश दिले होते, मात्र हा गुन्हा मुंबईत घडल्याने त्याचा तपास मुंबई पोलिसांकडे सोपविण्यात आला होता, दोन वर्षांनंतर या अभिनेत्रीच्या तक्रार अर्जावरून ओशिवरा पोलिसांनी गुरुवारी या दोघांविरुद्ध बलात्कारासह अन्य भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यात लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होऊन त्यांची जबानी नोंदविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here