अॅड.उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक; रावेर येथील हत्याकांड माणूसकीला काळीमा फासणारे
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – बोरखेडा, ता. रावेर येथील हत्याकांड माणूसकीला काळीमा फासणारे असून, या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी व पिडीतांना जलद न्याय मिळण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. यासाठी अॅड.उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज रावेर येथे बोलताना दिले.
बोरखेडा, ता.रावेर येथे चार बालकांचा निघृण खून झाला, त्या ठिकाणास गृहमंत्री श्री.देशमुख यांनी आज दुपारी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व पिडीत कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सात्वंन केले. यावेळी बोलताना गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले की, या हत्याकांडाचा पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून त्यांना सकारात्मक पुरावे मिळाले आहे काही संशयितांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.
दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक तो तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर शासन नियमानुसार पिडीतांना योग्य ती मदत देण्यात येईल तसेच त्यांना रेशनकार्ड, जातीचा दाखला, घरकुल व शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिका-यांना दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.रंजनाताई पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, प्रातांधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसिलदार उषाराणी देउगुणे, अॅड.रविंद्र पाटील, अभिषेक पाटील, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.







