कोरोनामुळे यंदा अत्यंत साध्या पध्दतीने होतोय साजरा नवरात्रोत्सव
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – औरंगाबाद पासून ३५ किलोमीटर अंतरावर तर खुलताबाद येथून ११ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून ९१३ मीटर्स उंचीवर असलेले मराठवाड्याचे महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र म्हैसमाळ येथील श्री गिरीजामाता देवीचे प्रसिद्ध जागृत स्थान आहे.येथे दरवर्षी नवरात्रीचा उत्सव मोठया भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जातो.
देवस्थानच्या अध्यक्ष तथा तहसीलदार यांच्या हस्ते घटस्थापना करून विधिवत पूजाअर्चा , नैवैद्य , महाआरती केली जाते. दररोज सकाळी , संध्याकाळी सनई -चौघडा वाजविला जातो. अखंड नंदादीप लावला जातो. अष्टमीला होमहवन केला जातो. विजयादशमीला शमीपूजन , सीमोल्लंघन होते. नवरात्रोत्सवानिमित्त भक्तांचे मनोरथ पूर्ण करणा-या श्री.गिरिजादेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भक्तगण गर्दी करतात. कोणी पर्वताच्या पायथ्यापासून दंडवत करीत आपले नवस फेडतात तर कोणी तासनतास रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतात. म्हैसमाळ धार्मिकदृष्ट्या जसे प्रसिध्द आहे तसे मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटनदृष्ट्या देखील महत्वाचे पर्यटनस्थळ आहे.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत , या साडेतीन शक्तीपीठांपैकी श्रीक्षेत्र तुळजाभवानी हे पूर्ण शक्तीपीठ आहे. त्या शक्तीपिठातले श्री.गिरिजादेवी एक पीठ असल्याचे पुढील आरतीच्या ओळीवरून सिद्ध होते. ‘ ओवाळीन औजा शिव सहजा आदि भवानी गिरिजा कल्लोळस्तरजा l चारभूजा आई तुकाई तुळजा ओवाळीन औजा l l धृ l l सह्यादीच्या हया शिखराला पद्मपुराणात महेशाद्रीच्या नावाने संबोधिले आहे. कारण महादेव , भगवान शंकराने येथे वास केला होता , म्हणून महेशाचेमाळ म्हणजेच आजचे म्हैसमाळ . पद्यपुराणात म्हैसमाळ संबंधी असे सांगितले आहे की, एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत असतांना माता पार्वती त्या खेळत हरली. व उपस्थित देवगण हसले. म्हणून रुसून पार्वती माता कैलास पर्वताचा त्याग करून दक्षिणेकडील पर्वत शिखरावर आली. माता पार्वतीने याठिकाणी कठीण तपश्चर्या केली. भगवान शंकर पार्वती मातेचा शोध घेत या पर्वतावर येतात. त्यामुळे या पर्वताला महेशाद्री असे म्हटले जाते.
साक्षात महेशाने वास केलेले हे पठार म्हणजेच म्हैसमाळ. म्हैसमाळला काम्यकवन अथवा उमावन म्हणूनही संबोधिले जाते. भगवान शंकराने पार्वतीसह येथे वास केला , असा स्पष्ट उल्लेख काशीखंड या ग्रंथात अध्याय ४९ मध्ये श्री, शिवदास गोमा यांनी केला आहे.या विधानास पद्यपुराणातील शिवालय महात्म्य अध्याय ५ मधील पुढील उता-यावरूनही पुष्टी मिळते. ततो गच्छे महेशाद्रेः शिखरे कामदे ll ७० ll यस्मादेलानदी पुण्या समुद्रभुजा द्विजोत्तमाः ll ७१ ll सनेत्य गिरिज यत्र तयः मृत्वा मृदृस्तरम् ll ७२ ll पद्मास्थ औदुंबर यत्र तीर्थम् उमावनमितीर्यते ll ७३ ll अर्थात ज्या महेशाद्रीच्या शिखरापासून पुण्यकारक एलनदी निघाली. जेथे पूर्वी गिरिजेने येऊन तप केल्यामुळे तिला महेश्र्वर पती मिळाला , म्हणूनच ‘ उमावन ‘ असे उपनामाने म्हैसमाळ प्रसिध्द आहे. श्रीक्षेत्र म्हैसमाळ येथील श्री.गिरिजादेवीविषयी पद्मपुराण , काशीखंड , शिवालय महात्म्य , ब्रम्हसरोवर आदि धार्मिक ग्रंथात उल्लेख आलेला आहे.
नवरात्रोत्सव दरवर्षी श्री.गिरिजादेवी मंदिरात नवरात्र उत्सव मोठया भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो.घटस्थापना करून देवीची विधिवत पूजाअर्चा करून नैवैद्य , आरती केली जाते. अखंड नंदादीप लावला जातो. अष्टमीला होमहवन केला जातो. देवीच्या मंदिरात मोठा चौघडा आहे. तो दिवसातून चार वेळा वाजविला जातो.मंगलमय सनईचा सूर आणि चौघड्यांच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून जातो.श्री गिरिजादेवी मंदिराचा गाभारा पहाटे पाच वाजता उघडला जातो. व रात्री बाराच्या सुमारास बंद केला जातो. नवरात्रोत्सवात श्री.गिरिजादेवीचे आकर्षक रूप पाहयला मिळते.
देवीला सोन्याचांदीच्या दागिने ,बहुमोल रत्ने, अस्सल सोन्याच्या माळा , गोट , तोडे ,पाटल्या, कंबरपट्टा , रत्नजडीत टोप, सौभाग्य अलंकारांनी सजविले जाते. नेपाळच्या राणीने मनोरथ पूर्ण झाल्यामुळे श्री .गिरिजादेवीला अर्पण केलेला रत्न हार देवीला घातला जातो. श्री.गिरिजादेवी मंदिराचा जीर्णोद्धार श्री.गिरिजादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरु आहे.या कामासाठी जवळपास तीन कोटीच्या वरती रुपये खर्च अपेक्षित आहे. ६० बाय ११४ फुट आकाराचा सभामंडप उभारण्यात येत आहे. २६ बाय ६० फुट गाभारा करण्यात आला आहे. ५१ फुट कळसाची उंची असणार असून मंदिरावर कळस बसविण्यात आलेला आहे. शुभ्र मार्बलमध्ये आकर्षक कोरीव काम करण्यात येत आहे.भाविकांनी जीर्णोद्धार कामासाठी सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष तहसीलदार तसेच समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.
“नवरात्र उत्सवाला आज पासून जरी सुरुवात होत आहे.पंरतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्याने भाविकांची गिरिजा देवी अथवा कोणत्याही देवा देवीच्या दर्शनासाठी येऊ नाही.या वर्षी चे गंभीर लक्षात घेऊन देवा देवींची घरीच पूजा अर्चना करावी.”
– सीताराम मेहेत्रे (पोलीस निरीक्षक खुलताबाद)







