जळगाव (संपादक सुनिल पाटील) – माजी विरोधी पक्षनेते व माजी मंत्री तसेच उत्तर महाराष्ट्रात भाजपाची पायाभरणी करणारे नेते एकनाथराव खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आता त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. फक्त एकनाथराव खडसेच नाही तर त्यांची कन्या रोहिणीताई खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
एकनाथराव खडसे येत्या 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.एवढंच नाहीतर एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांना 22 ऑक्टोबरला 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन सुद्धा केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
एकनाथराव खडसे यांच्या जाण्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे हे निश्चित आहे. खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे यासुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देणार आहे. तसेच जळगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद यातील भाजपामधील एकनाथराव खडसेंना मानणारा गटदेखील पक्ष बदलाच्या तयारीत आहे. त्यामुळे खडसेंचा पक्षबदल हा भाजपाला चांगलेच मोठे खिंडार पाडणारा ठरणार आहे.
विशेष म्हणजे, शरद पवार यांनी सोमवारीच एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सूचक विधान केले होते. ‘एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असं पवार म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निर्णय झाला आहे, फक्त खडसेंच्या निर्णयाची औपचारिकता बाकी होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.







