हवेली (विशेष प्रतिनिधी) – शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख, मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत हवेली तालुक्यातील अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झालेल्या गावांना भेटी देऊन सर्वसामांन्यांच्या व्यथा जाणून घेत काही ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आर्थिक मदतही केली.
या पाहणी दौऱ्यावेळी मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोणी काळभोर येथील पाटीलवस्ती व बेटवस्ती या ठिकाणी भेटी दिल्या. या भागातील ओढ्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे केलेल्या बांधकामांमुळे शेतीसह लोकांच्या घरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याच्या नागरिकांनी समस्या सांगितल्या. या ठिकाणी अनेक घरांना पाण्याने वेढा घातल्याने लोकांना घराबाहेर पडणेही शक्य नसल्याचे दिसून आले. लोकांना शासकीय मदतीबरोबरच ओढ्यावरील अतिक्रमण दूर व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी आढळराव पाटील यांनी सांगितले.
उरळी कांचन येथे अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन ओढ्या नाल्यांवरून पाणी वाहून गेल्याने बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी साचले होते. येथील भागाची पाहणी करताना येथे छोटी टपरी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीची भेट घेऊन मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हाप्रमुख माउली कटके यांच्या हस्ते रोख आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
शिंदवणे व वळती येथे ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील माती, ताली व पाणंद रस्तेही वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे ग्रामस्थांनी आढळराव पाटील यांच्या निदर्शनास आणले. वळती येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन गावातील रस्ते मुरुमीकरण कामासाठी हातभार म्हणून शिवसेनेच्या वतीने रोख आर्थिक स्वरूपात मदत देण्यात आली.
यावेळी मा. खासदार आढळराव पाटील म्हणाले कि, गेल्या अनेक वर्षांतुन पहिल्यांदाच हवेली तालुक्यातील अनेक महत्वाच्या गावांना अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी, व्यापारी पूर्णपणे हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. येथील पिकांचे योग्य पंचनामे करून तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेत असून याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व माहिती संकलित करून तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शासन, प्रशासन आपल्या सोबत असून शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने संकटाचा सामना करावा असे यावेळी आढळराव पाटील यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले.
या पाहणी दौऱ्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख माउली कटके, हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, जिल्हा संघटक रमेश भोसले, महिला आघाडी जिल्हा संघटक श्रद्धा कदम, युवासेना जिल्हा युवा अधिकारी मछिंद्र सातव व शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले.







