मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – गटसाधन केंद्र निलंगा येथे ‘बाला’ उपक्रमांतर्गत ६० निवडक शाळेतील मुख्याध्यापक, ग्रामसेवक, शा. व्य. स अध्यक्ष यांची कार्यशाळा निलंगा तालुक्याचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, गटशिक्षणाधिकारी स्वामी, शिक्षण विस्तार अधिकारी स्वामी जी.एस. यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आली होती.
इमारत -एक शैक्षणिक साधन हा उपक्रम निलंगा तालुक्यातील ६० शाळांमध्ये राबविला जात आहे. सदरील कार्यशाळेस हंसराज भोसले (महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा) गटसमन्व्यक कुलकर्णी सर्व केंद्र प्रमुख, गट साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती, निवडक ६० शाळांचे मुख्याध्यापक, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामसेवक उपस्थित होते. सदरील कार्यशाळेचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांनी केले. तर अमोल ताकभाते यांनी सी. एस. आर. फंड व लोकसहभागातून आपण कशाप्रकारे मदत घेऊन शाळा बाला उपक्रमांमध्ये तयार करू शकतो. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
बाला उपक्रमांतर्गत भौतिक साधनांना शैक्षणिक साधनांमध्ये रूपांतरित करून त्याचा उपयोग मुलांचं शिकणं सहज व सुलभ करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला, चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी कशाप्रकारे वापर करता येऊ शकतो. यावर हालकरे यांनी पीपीटी च्या माध्यमातून सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच सचिन डोईजोडे यांनीही बाला उपक्रमांतर्गत साहित्यनिर्मितीसाठी ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, कशाप्रकारे मदत करू शकतात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन हालकरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डोईजोडे यांनी केले. कोविड – १९ च्या सर्व नियमांचे पालन करून ही कार्यशाळा यशस्वी करण्यात आली. यासाठी गटसाधन केंद्रातील सर्व साधन व्यक्तींनी सहकार्य केले.







