मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कंत्राटी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असून त्यांचा मार्च २०२० पासून प्रलंबित असलेला कोविड भत्ता दिवाळीपूर्वी देण्यात यावा, असे निर्देश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान व कोविड भत्ता रुपये ३००/- बाबत महापालिका अधिकारी व युनियनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक भायखळा येथील महापौर निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. 
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. साधारण दीड ते दोन तास ही बैठक चालू होती. बैठकीला म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या आदेशाने चिटणीस संजय वाघ, उपाध्यक्ष रंजना नेहवालकर, सरचिटणीस अडवोकेट रचना अग्रवाल, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) (प्र.) देविदास क्षिरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. प्राणिता टिपरे व मुं. जि.क्ष.नि.सेना संघटनेचे अध्यक्ष सागर कदम, उपाध्यक्ष अमोल पाटील, कार्याध्यक्ष भिमराव शिंदे, सचिव सुजाता पुंडे उपस्थित होते.
महापौर पेडणेकर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देताना पुढे म्हणाल्या की, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत १९९९ पासून संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. कोविड – १९ च्या काळामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे कोविड भत्ता देण्यात आला. त्याप्रमाणेच या कर्मचाऱ्यांना सुद्धा भत्ता देण्यात यावा. बरेच दिवसापासून हा विषय प्रलंबित असून आता यामध्ये अधिक वेळ न घालविता दिवाळीपूर्वी या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळण्याबाबतची कारवाई तातडीने करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या विषयाबाबत महापालिका आयुक्तांसोबत सोबत चर्चा केली असून यावर्षी या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचे बजेट हेड सुरू करण्याबाबतचे पत्र देण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. जेणेकरून पुढच्या वर्षी या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणे सोयीचे होऊ शकेल, असे महापौरांनी यावेळी सांगितले.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम व चिटणीस संजय वाघ यांनी क्षयरोग नियंत्रण संस्थेमधील कर्मचारी यांच्या प्रलंबीत कोविड भत्ता चे काम मार्गी लावल्याने सर्व क्षयरोग कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या बद्दल सर्व क्षयरोग कर्मचारी यांनी सघटनेचे व महापौर यांचे आभार व्यक्त केले आहेत. क्षयरोग कंत्राटी कर्मचारी यांचे वेतन अतिशय कमी असून त्यांना याआधी केव्हा दिवाळी भेट मिळाली नव्हती. परंतु हा कोविड भत्ता आमच्यासाठी दिवाळीची भेट च आहे आणि यामुळे आमची दिवाळी चांगली व आनंदात जाईल असे मुं. जि. क्ष. नि. सं. सेना संघटनेच्या सचिव सुजाता पुंडे यांनी सांगितले.







