शेतकऱ्यांवर अन्याय खपवून घेणार नाही : सभापती देविदास पिंगळे
नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर घेऊन आलेल्या शेतकऱ्याला दमदाटी आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची सभापती देविदास पिंगळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. ‘त्या’ व्यापाऱ्यावर तात्काळ कारवाई केली असून, त्याचा परवाना निलंबित केला आहे. बाजार समिती ही शेतकऱ्यांची असून, येथे शेतकऱ्यांवर अन्याय कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सभापती पिंगळे यांनी दिला आहे. बाजार समितीत कुठलीही अडचण किंवा अन्याय होत असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापती देविदास पिंगळे यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यात उमराणे येथील शेतकरी अशोक देवरे यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत कोथिंबीर विक्रीकरिता आणली होती. लिलाव दरम्यान योग्य दर मिळाला नसल्याने देवरेंनी कोथिंबीर परत नेण्याचा निर्णय घेतल्याने देवरे आणि व्यापारी मोहन खांडबहाले यांच्यात वाद सुरू असताना त्याचा शेतकऱ्याने मोबाईलवर व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर व्हायरल केला. सदर प्रकारची माहिती कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती देविदास पिंगळे यांना मिळाली होती त्यानंतर पिंगळे यांनी या प्रकरणी तत्काळ दखल घेत बाजार समितीची प्रतिमा मलिन केली म्हणून व्यापारी खांडबहाले यांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली.
तर कारवाई करणार
कृषी उत्पन्न बाजारसमिती शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना दमबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई केली असून यापुढे कोणत्याही व्यापारी व आडत्याने शेतकऱ्यावर दादागिरी केल्याचा प्रकार उघडकीस आला किंवा तक्रार प्राप्त झाल्यास बाजारसमितीकडून कारवाई केली जाईल.
– देविदास पिंगळे, सभापती, कृउबा








