नाशिक (विशेष प्रतिनिधी) – नुकत्याच नाशिक बाजार समितीमध्ये देवळा तालुक्यातील उमराणे येथील कोथींबीर उत्पादक शेतकऱ्याने आपल्या कष्टाने घाम गाळून पिकविलेल्या कोथिंबीरीला मनासारखा भाव मिळाला नाही म्हणून परत घेऊन जात असताना तेथील व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दादागिरी करत शिवगाळ करुन कोथिंबीर परत नेण्यास मज्जाव केला. ही अत्यंत गंभीर बाब असून, निंदनीय प्रकार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक येथील समन्वयक कुबेर जाधव यांनी बुलंद पोलिस टाइम्सशी बोलताना सांगितले.
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, चार महिन्यांपूर्वी बागलाण तालुक्यातील शेतकरी लॉकडाऊनच्या काळात टरबूज लिलावासाणी घेऊन आला असता, त्याचे पैसे रोखीने देण्यास व्यापाऱ्याने टाळाटाळ केल्याने, या संतप्त शेतकऱ्याला सभापतींकडे दाद मागावी लागली होती. असाच प्रकार उमराणे बाजार समितीत दोन महिन्यांपूर्वी कांद्याचा वांदा करून शेतकऱ्याला प्रतिक्विंटल ४० रुपये कमी करून, व्यापाऱ्याने अरेरावी केली होती. या प्रकारावर सचिवांनी मध्यस्ती करत तडजोड केली. शेतकऱ्यांच्याबाबतीत असे प्रकार वारंवार घडत असून, अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्यांचे लायसन्स रद्द करून जरब बसविली पाहिजे, असेही ते म्हणाले.







