शिरपूर (प्रतिनिधी) – शिवसेनेचे गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक या मोहिमेअंतर्गत सुरु झालेले सदस्य नोंदणी अभियान शिवसैनिकांनी प्रत्येक घराघरापर्यंत पोहचवावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी येथे केले. तालुक्यातील बभळाज गावात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात श्री.हेमंत साळुंके यांच्या हस्ते, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी शेकडो नवीन शिवसैनिकांनी प्राथमिक सदस्य म्हणून नोंदणी केली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. साळुंके म्हणाले की, बाळासाहेबांनी सांगितलेली समाजकारणाची पध्दत आजपर्यंत आपण विसरलेलो नाही. ज्या गोर-गरीबांचे प्रश्न सोडविता येतील त्या सर्वांचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवावे. राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख श्री.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक मोहिम राबवून शिवसैनिकांनी एकजुटीने पक्षाच्या कामाला लागावे. शिवसेना पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी माझे घर, माझी जबाबदारी हे अभियान सुरु केले. त्याचे परिणाम आता दिसू लागलेत. हेच अभियान इंग्लंडमध्ये सुध्दा राबविले गेले. इंग्लंडसारख्या देशाने सुध्दा उध्दवसाहेबांची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले जनहिताचे निर्णय आपणांसर्वांना घराघरापर्यंत, गावागावापर्यंत पोहचवायचे आहेत. ‘विकेल ते पिकेल’ च्या माध्यमातून येणाऱ्या कालखंडात फार मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
प्रत्येक गावागावात कृषी समित्या स्थापन करुन शेतकऱ्यांच्या माल सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी आपणांस प्रयत्न करावयाचा आहे. शेतकरी सुखी व्हावा याकडे उध्दवसाहेबांचे लक्ष आहे. जनतेचे प्रश्न सुटावेत यासाठी दर सोमवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिंदखेडा येथे जनता दरबार सुरु केले आहे. त्या जनता दरबाराला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यात अनेक लोकांचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी झालो. प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरु आहे. लवकरच ते देखील सोडविण्यात येतील असा विश्वास श्री.साळुंके यांनी बोलतांना व्यक्त केला.
यावेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या समवेत सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख भरतसिंह राजपूत, उपसंघटक विभाभाई जोगराणा, विधानसभा संघटक छोटूसिंह राजपूत, शहरप्रमुख मनोज धनगर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष नंनाभाऊ जाधव, शिव वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख अनिकेत बोरसे, तालुका प्रमुख मसूद शेख, उपतालुकाप्रमुख देवा बंजारा, शेख रेहान, वज्जू भाई, संजय राठोड, तुकाराम भिल, तऱ्हाडीचे सरपंच सुनील धनगर, राहुल ईशी, संजय जाधव, शिरपूर उपशहरप्रमुख योगेश ठाकरे, बंटी लांडगे, प्रेम चौधरी, युवासेनेचे गोलू मराठे, पिंटू शिंदे, अमोल महानोर, अंकित भिसे, गणेश कोळी, अविनाश कर्नल, अरुण कर्नल, मोहित पवार, विनोद पावरा, महादेव पावरा, भगवान पावरा, एन.डी.पवार, अमोल गुजर, विनोद जाधव यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिरपूचे तालुका प्रमुख श्री. दिपक चोरमले यांनी परिश्रम घेतले.







