मुंबई (चित्रपटविभाग उपसंपादक सचिन देसाई) – 90 च्या दशकात ‘फरेब’ आणि ‘मेहंदी’ यासारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता फराज खान याचे आज निधन झाले. तो 46 वर्षांचा होता. अभिनेत्री पूजा भट हिने फराजच्या निधनाची दु:खद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘जड अंत:करणाने ही बातमी देतेय, फराज खान आपणा सर्वांना सोडून गेला. तो एका आणखी सुंदर जगात असेल, अशी आशा करते. तुमच्या मदतीसाठी आभारा. कृपया, त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा,’असे टिष्ट्वट पूजाने केले आहे.
मेंदूच्या संसर्गामुळे फराज खान गेल्या अनेक दिवसांपासून बेंगळुरूच्या रूग्णालयात भरती होती. त्याच्या छातीत संसर्ग झाला होता. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचला होता. तेव्हापासून त्याची प्रकृती अतिशय गंभीर होती. याकाळात आर्थिक अडचणीमुळे उपचार घेणे कठीण झाले होते. अशास्थितीत पूजा भटने त्याच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. तिच्या आवाहनानंतर अनेक लोक त्याच्या मदतीसाठी पुढे आले होते. अभिनेता सलमान खान त्याच्या मदतीसाठी धावून आला होता. फराजच्या उपचाराचा जिम्मा त्याने उचलला होता.
सलमान खान ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने एका रात्रीत सुपरस्टार झाला. हा सिनेमा आधी फराज खानला ऑफर झाला होता. होय, फराज खान याला सर्वप्रथम ‘मैंने प्यार किया’साठी साईन केले होते. सुरज बडजात्या यांनी ‘मैंने प्यार किया’साठी अनेक नवीन चेह-यांचे ऑडिशन घेतले होते आणि यातून फराज खानची निवड करण्यात आली होती. चित्रपटासाठी फराजला साइन करण्यात आले आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाची तारीखदेखील ठरली. पण ऐनवेळी फराज खूप आजारी पडला. चित्रीकरण करणे त्याला शक्यच नव्हते. त्यामुळे सुरज बडजात्या प्रचंड टेन्शनमध्ये आले.
ऐनवेळी सलीम खान यांच्या मुलाचे म्हणजे सलमान खानचे नाव त्यांना कोणीतरी सुचविले आणि हा चित्रपट सलमानला मिळाला. या चित्रपटानंतरच सलमानची रुपेरी पडद्यावरील वाटचाल सुरु झाली.







