मुंबई (चित्रपटविभाग उपसंपादक सचिन देसाई) – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील क्रूरकर्मा अजमल कसाब याला फाशीच्या तख्तावर पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार्या उज्ज्वल निकम यांच्यावर चरित्रपट येणार आहे.
या चरित्रपटाची कथा लिहिण्यात आली असून लवकरच अभिनेत्यांच्या शोधाला सुरुवात होणार आहे. दिग्दर्शन उमेश शुक्ला करणार आहेत. उमेश शुक्ला यांच्या नावावर ओह माय गॉड, 102 नॉट आउट असे सुपरहिट चित्रपट आहेत. सध्या त्यांचे डीडीएलजे आणि आँख मिचोली हे चित्रपट तयार होत आहेत.
या चित्रपटांनंतर उमेश यांचा पुढील चित्रपट निकम यांचा बायोपिक असणार आहे. याचं नाव निकम असं असणार आहे. बॉम्बे फेबल्स आणि मेरी गो राउंड स्टुडिओज यांनी याचे अधिकार विकत घेतले आहेत. या चरित्रपटाची पटकथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला यांनी लिहिली आहे.
यावर निकम यांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली असून एका चांगल्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव तसंच या कथेपासून लोकांना प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा केली आहे.







