तरुणांनी उलटवली पाणीपुरीची गाडी, पाणीपुरीचा रस्त्यावर पडला खच
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – कोल्हापुरात पाणीपुरी बनविण्यासाठी एका परप्रांतीय पाणीपुरीवाल्याने टॉयलेटच्या नळावरुन पाणी भरत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यानंतर रंकाळा तलावाशेजारील पाणीपुरीची गाडी अज्ञात तरुणांनी उलटवून दिली.
या प्रकारामुळे काही काळ रंकाळा तलावाजवळ वातावरण तंग झाले होते. तर त्याच्याजवळील पाणीपुरीचे पाणी रस्त्यावर फेकण्यात आले. पाणीपुरीचाही रस्त्यावर खच साचला होता. याबाबतीत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती.
दरम्यान, या गलिच्छ प्रकारामुळे कोल्हापुरातील पाणीपुरी खवय्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे बरेच महिने बाहेरचे काही खाता येत नव्हते आणि आता खाण्याची सुट मिळाली असताना ग्राहकांच्या आरोग्याला फाट्यावर मारून काही महाभाग घाणेरडा प्रकार करत आहेत. त्यामुळे खवय्यांच्या मनात बाहेरच्या खाण्याबाबत साशंकता निर्माण होत आहे. याचा परिणाम जे सचोटीने आणि ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेऊन धंदा करतात त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे.







