
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीवर तातडीने विद्युत दिवे बसविण्यात येऊन हा परिसर दिवाळीपुर्वीच उजळून निघेल. या परिसराची लवकरच स्वच्छता करुन भोसले स्मारका संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात संबधित सर्वच विभागासह ठराविक प्रतिनिधिची बैठक घेऊन भोसले स्मारक विकासासह हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी (ता. 3) वेरुळ येथील भोसले स्मारकाची पाहणी करताना सांगितले.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी वेरुळ येथील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी संबधित विभागाकड़ून येथील परस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी या स्मारकाच्या झालेल्या दुरावस्थेची माहिती देताना सांगितले की याठिकाणी या अगोदरची कामे निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या पडझड झालेली आहे. त्यामुळे स्मारकाचा नवीन आराखडा बनवून विकास करणे गरजेचे असल्याचे सांगितले. स्मारक ग्रामपंचायतीच्या ताब्यात दयावे अशीही मागणी पवार यांनी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, खुलताबाद पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे, वास्तुविद्याविशारद प्रदीप देशपांडे, छावाचे किशोर चव्हाण, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, नायब तहसीलदार पी. बी. गवळी, डॉ. बी. आर. पांडवे, उपअभियंता बांधकाम एस. जी. केंद्रे, प्रशासक आर. एफ. पाटील, ग्रामसेवक जी. एस. गायकवाड, मंडळ अधिकारी विलास सोनवणे, पोलिस पाटील रमेश ढिवरे, तंटामुक्ती अध्यक्ष नाना ठाकरे, गोर सेना जिल्हा संघटक दिगंबर राठोड, विजय राठोड, गणपत म्हस्के, विजय भालेराव, किरण काळे, संदीप निकम, अनिल मिसाळ, गणेशसिंह हजारी, सागर मातकर, सुनील लोखंडे, शंकर मिसाळ, एन. एफ. मोहम्मद, राजेंद्र आडे आदींची उपस्थिति होती.






