एरंडोल (तालुका प्रतिनिधी वाल्मिक सोनवणे) – एरंडोल हे तालुक्याचे ठिकाण असून, राष्ट्रीय महामार्गावर आहे. तसेच औरंगाबाद शिरपूर व एरंडोल ते नांदगाव येवला ह्या दोन राज्यमार्गानीदेखील जोडलेले आहे. यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. या रस्ता अपघातांमध्ये जखमी झालेल्या अतिगंभीर रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयामार्फत आरोग्य सुविधा देण्यात व तातडीचे उपचार करण्यात प्रचंड अडचणी व समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे एरंडोल शहरात ट्रॉमा सेंटरची उभारणी करावी, अशी मागणी एरंडोल शहर सर्वपक्षीय समितीने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
ट्रॉमा सेंटर उभारणीस मंजूरी मिळाली तर सद्यस्थितीत असलेली प्रशिक्षीत व तज्ञ डॉक्टरांची कमतरता, साधनसामुग्री, प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, आरोग्यसेविका, रुग्णवाहिका यांची कमतरता दूर होणार आहे. कोविड १९ च्या साथरोगाच्या निमित्ताने वरील आरोग्य सुविधांच्या कमतरतेबाबतची जाणीव आरोग्य यंत्रणेस व पदाधिकाऱ्यांना झालेलीच आहे.
जिल्हा रस्ते सुरक्षा समिती जळगावच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनीही रस्ते अपघातांबाबत व शहरालगत वाढत असलेल्या घटनांबद्दल व त्यात मृत्यूमुखी पडत असलेल्यांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत तातडीच्या उपचारांसाठी आरोग्य यंत्रणेस ट्रामा सेंटर उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे एरंडोल शहर सर्वपक्षीय समितीने जामनेर, चोपडा व इतर तालुक्यांच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असल्यामुळे एरंडोल येथे ट्रामा सेंटर उभारण्याकामी आरोग्य यंत्रणेला आदेश द्यावे, अशी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना विनंती केली आहे.
निवेदनावर नगराध्यक्ष रमेश परदेशी, शिवसेना उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर, एरंडोल तालुका मेडीकल असो.चे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा, माजी नगराध्यक्ष, शिवसेना तालुका संघटक राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक व तालुकाध्यक्ष काँग्रेस आय विजय महाजन, तालुका उपसंघटक शिवसेना राजू राठोड, मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, माजी उपनगराध्यक्ष डॉ.सुरेश पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक एस.के.चौधरी, नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकूर यांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदनाच्या प्रती खासदार उन्मेश पाटील, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा शल्यचिकीत्सक जळगाव यांनाही देण्यात आल्या आहेत.







