शरद पवार यांचेकडून आनंदराव पाटील सन्मानित

aatpadi

आटपाडी (प्रतिनिधी) – आटपाडी तालुक्यासह माणदेशात डाळींब चळवळीसाठी उभे आयुष्य समर्पित केलेल्या आटपाडीच्या आनंदरावबापु गणपती पाटील यांचा राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांनी गौरव करून अप्रत्यक्षरित्या हजारो डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथेचा सन्मानच केला .

 

खांजोडवाडी येथील डाळींब बागांची पाहणी करण्यासाठी श्री .शरद पवार साहेब आटपाडी च्या दौर्‍यावर आले होते . तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खानापूर आटपाडी मतदार संघाचे नेते आनंदरावबापु पाटील यांच्या निवासस्थानी श्रीयुत पवार साहेबांनी सदिच्छा भेट दिली .

 

दुष्काळी भागात डाळींब क्रांतीला शासनस्तरावरून मोठे प्रोत्साहन आणि मदत देण्याचे काम शरद पवार साहेबांनी केले . डाळींब क्रांतीचे जनक म्हणून देशभर ओळखले जाणाऱ्या शरद पवार साहेबांच्या विचार धारेवर प्रेम करणाऱ्या आनंदरावबापु पाटील यांनी ,स्वतःला झोकून देवून ही चळवळ आटपाडी तालुक्यासह संपूर्ण माणदेशात रुजविण्याचा मोठा प्रयत्न केला . १९८९ मध्ये सुरु झालेल्या डाळींब चळवळीत आनंदरावबापू पाटील यांनी, खड्डे खुदाई, मोजमापे, लागवड, खते, औषधे, छाटणी, फवारणी , विक्री आणि परदेशी निर्यातीबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रबोधन केले . त्याचाच परिपाक म्हणजे आटपाडी तालुक्यात सर्वत्र तुफान बनलेली डाळीब चळवळ . या चळवळीने आटपाडी तालुक्यात प्रचंड मोठी आर्थिक क्रांती केली . अखिल भारतीय डाळींब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्यासोबतीने ही चळवळ सर्वदूर नेण्यात आणि इंडियन अनार ला जगमान्यता मिळवून देण्यात हे दोघे मान्यवर यशस्वी झाले . अविट गोडी, रसरसीत, लाल भडक आणि वजनदार डाळींब क्रांतीसाठी ३० वर्षे प्रयत्न करीत आलेल्या आनंदरावबापु पाटील यांचा आवर्जून गौरव करताना शरदचंद्रजी पवार यांनी त्यांच्या ध्येयवेड्या कामाचे तोंड भरून कौतूक करीत त्यांना सन्मानीत केले .

 

भिंगेवाडी येथे पाटील कुटुंबीयातील माता भगिनीनी शरद पवार साहेब यांचे औक्षण करून स्वागत केले . आमदार श्रीमती सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख, अरुणअण्णा लाड , प्रभाकर चांदणे, अविनाशकाका पाटील, अॅड .बाबुराव मुळीक, भारततात्या पाटील, अशोकराव पाटील, मनोज पाटील, नेताजी पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here