नाशिक (विशेष प्रतिनिधी) – वीजेचा शॉक लागून सख्ख्या तीन भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव पिंपळे या गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीत जालन्यामध्ये काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार समोर आला आहे. दरम्यान सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव २७ वर्षे, रामेश्वर आप्पासाहेब जाधव २४ वर्षे आणि सुनिल आप्पासाहेब जाधव अशी मयत भावांची नावं आहे. ऐन दिवाळीत तिघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तिघे भाऊ शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेले होते. शेतात जाताच पाणी सोडण्यासाठी तिघे विहिरीवर विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले असता शॉक लागला. यावेळी एकमेकांची मदत करण्यात तिघांचाही मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. नेमका शॉक कसा लागला याचाही शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. शेतामध्ये तिघा भावांना शॉक लागताच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेईपर्यंत तिघांचेही प्राण गेल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
अतिशय वाईट घटना – कुबेर जाधव
या भावांच्या मृत्यूप्रकरणी दोष कुणाला द्यावा हेच कळत नाही आता. सत्ताधारी असो कि विरोधक सत्ता आली का शेतकऱ्यांना विसरायचं आणि विरोधात बसले कि मग मात्र शेतकऱ्यांचा पुळका. दिवसा वीज द्या, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळाला तर ते बिल भरतील. अन्यथा.. शेतकऱ्यांना वीज मिळते कशी आणि त्यांच्याकडून वीजबिल आकारलं कस जात हा संशोधनाचा भाग होऊ शकतो. मुळात शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरला तर वीज वितरण कपंनीला आपली चुकीची धोरण बदलावी लागतील पण.. रस्त्यावर उतरेल कोण.. तुम लढो हम कपडे सम्भालते, अशी मानसिकता, आणि आपल्या माणसाचं खच्चीकरण करणं थांबवून एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढावं लागेल. या माझ्या शेतकरी बंधूना भावपुर्ण श्रद्धांजली
– इंजि. कुबेर जाधव, संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून तिघा भावंडांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणात कुटुंबीय आणि स्थानिकांचीही चौकशी करत आहेत. तर घरातून शेतात गेलेली तरुण लेकरं परत कधीच घरी परतणार नाहीत या विचारांनी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.







