कोल्हापूरच्या जवानाला काश्मीरमध्ये वीरमरण

kolhapur-jawan

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – शनिवारी पहाटे जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नौशेरा येथे पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या चकमकीत निगवे खालसा (ता. करवीर) येथील जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील (वय 37) हे शहीद झाले. बढतीनंतर वाढीव सेवाकालात देशभक्‍तीला वाहून घेतलेल्या जिगरबाज जवानाला वीरगती प्राप्‍त झाली. पाटील यांना वीरमरण आल्याच्या वृत्तानंतर जिल्ह्यावर शोककळा पसरली.

 

संग्राम पाटील हे सैन्यदलात गेली वीस वर्षे देशसेवा बजावत होते. संग्राम यांचे प्राथमिक शिक्षण निगवे येथील प्राथमिक शाळेत झाले होते. माध्यमिक शिक्षण चनिशेटी विद्यालय तसेच येळवडे येथे आजोळी झाले होते. संग्राम पाटील फेबु्रवारी 2001 मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीत जीडी शिपाई म्हणून दाखल झाले होते. त्यांनी बेळगाव, पुंछ, जम्मू, दिल्‍ली येथे सेवा बजावली होती. सतरा वर्षांच्या सेवेनंतर त्यांना हवालदारपदी बढती मिळाली होती.

शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास राजौरीतील नौशेरा सीमेवर पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले.पहाटे चारच्या सुमारास संग्राम यांचा भाऊ संदीप याला भ्रमणध्वनीवर संग्राम शहीद झाल्याचे कळवण्यात आले. ही धक्‍कादायक बातमी ऐकताच संदीपचे काळीज अक्षरशः फाटले. मात्र, गोठलेले मन आणि थिजलेल्या भावनांना आवर घालत त्याने आई-वडिलांना संग्राम हल्ल्यात जखमी झाल्याचे सांगितले. तेव्हाच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.

गावात व परिसरात हे वृत्त वार्‍यासारखे पसरताच सर्वत्र सन्‍नाटा पसरला. चौकाचौकांत रस्त्यांवर लोक एकत्र जमून चर्चा करत होते. संग्राम यांच्या घरी या दुःखद घटनेची माहिती कळू नये, याची ग्रामस्थांनी पुरेपूर दक्षता घेतली होती. त्यांच्या गल्‍लीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. गल्‍लीतील वृत्तवाहिन्यांची केबलही बंद करण्यात आली होती. संग्राम यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, भाऊ, आठ वर्षांचा मुलगा शौर्य व तीन वर्षांची मुलगी शिवश्री असा परिवार आहे.

संग्राम यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी गावातील मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आ. ऋतुराज पाटील, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह पोलिस व सैन्यदलातील अधिकार्‍यांनी गावाला भेट देऊन अंत्यसंस्काराच्या पूर्वतयारीची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here