नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेल्या शेतकर्यांना दिवाऴीनंतर का होईना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार 917 शेतकर्यांच्या खात्यात 109 कोटींची मदत थेट जमा करण्यात आली आहे. उर्वरीत मदतही तातडीने जमा केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
करोना संकटाबरोबरच यंदा शेतकर्यांवर अतिवृष्टीचे संकट कोसळले. प्रारंभी जुन व जुलै महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये जोरदार पावसाने धुवून काढले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये जाता जाता पावसाने जिल्ह्यासह राज्यात धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. शेतात पाणी साचल्याने उभी पिके आडवी झाली. काही ठिकाणी पिके सडली.
जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा बसला. मका, कांदा, ऊस, सोयाबिन ही पिके आडवी झाली. बागलाणमध्ये डाळिंब तर निफाड व दिंडोरीमध्ये द्राक्ष बागांना तडाखा बसला.जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार 917 शेतकर्यांचे नुकसान झाले होते. राज्य शासनाने शेतकर्यांना दिवाळीपुर्वी दहा हजार कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपुर्वी ही मदत शेतकर्यांच्या खात्यावर जमा होईल असे सांगितले होते. मात्र ही मदत जमा न झाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी होती.
पण उशीराने का होईना जिल्ह्याला 110 कोटींची मदत प्राप्त झाली आहे. मागील एक आठवडयात युध्दपातळीवर ही मदत थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. पिकांसाठी हेक्टरी 10 हजार तर फळबागांसाठी 25 हजार मदत देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 55 हजार 580 शेतकर्यांना दहा हजार मदतीचा लाभ मिळाला आहे. तर, 6 हजार 641 फळ बागायतदारांना 25 हजार मदत प्राप्त झाली आहे. दिवाळीनंतर उशीराने का होइना मदत प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.







