भाजपचे ‘संकटमोचक’ ईडीच्या कारवाईने संकटात?

BHR

जळगाव (संपादक सुनिल पाटील) –

केंद्रातील भाजप सरकारने शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्यावर ईडीची कारवाई करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असतानाच, भाजपचे सकंटमोचक अशी ओळख असलेले नेत्यांचा उजवे हात समजले जाणारे जळगाव येथील सुनील झंवर या व्यावसायिकावर बीएचआर सोसायटी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी केल्याचा योगायोग जुळून आला आहे. एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाला महिनाही होत नाही तोच या नेत्याच्या खंद्या समर्थकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याने सरकारकडून आता भाजपा आमदारांची नाकाबंदी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

 

बेनामी मालमत्तेच्या ठेवींप्रकरणी चौकशीच्या रडारवर असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी अर्थात ‘बीएचआर’शी निगडित जळगावात पाच ठिकाणी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या १३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापे टाकले. संकटमोचक नेत्यांसोबत सावलीप्रमाणे वावरणारे सुनील झंवर यांच्या विविध फार्मवरदेखील छापे टाकल्याने ही कारवाई राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे. दीड हजार कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र, कंडारे यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांना हाताशी धरून कर्जदारांच्या जमिनी, तसेच स्थावर मालमत्ता कवडीमोल भावात विकल्याचा आरोप आहे. ठेवींच्या रकमा मॅचिंग करण्यासह तडजोडीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार अवसायकांमार्फत करण्यात आले. मात्र, ठराविक व्यक्तींनी या जमिनी, तसेच स्थावर मालमत्ता मातीमोल भावात खरेदी केल्या. यात झंवर यांचे नाव अग्रस्थानी आहे. या नेत्यांच्या आरोग्य शिबिरांसह अन्य कार्यक्रमांना झंवर यांच्या संस्थेचेच ‘फंडिंग’ असते. त्यामुळे झंवर यांच्यावर झालेली कारवाई ही अप्रत्यक्ष भाजपाच्या या नेत्यावरच निशाणा साधण्याचा प्रकार समजला जात आहे.

 

 

सुनिल झंवर यांच्यावर एकनाथराव खडसेंनी शालेय पोषण आहार घोटाळ्यात यापूर्वी अनेक वेळा गंभीर आरोप केले आहेत. विधानसभेत पुराव्यानिशी आरोप करूनही भाजप सरकारच्या काळात झंवर यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. झंवर यांना या नेत्याचे कृपाछत्र मिळाल्याने त्यांच्यावर भाजप सरकारच्या काळात कारवाई झालेली नाही. गेल्या महिन्यातच नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश करीत, असताना त्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे संकटमोचकांची आर्थिक शक्ती असलेल्या झंवर यांच्यावर बीएचआर प्रकरणी कारवाई करून या नेत्याला नाथाभाऊंनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

झंवर यांच्या व्यवहारांचे नाशिक कनेक्शनही चर्चेत आहे. नाशिकमधील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची नेहमीच ऊठबस आहे. महापालिकेतील अनेक ठेक्यांमध्येही झंवर यांची पार्टनरशिप असल्याची भाजपमध्येच चर्चा आहे. त्यामुळे झंवर यांच्या नाशिक कनेक्शनमुळे अनेक पदाधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता आहे. नाशिकमधील या नेत्याची सावली असलेल्या बोरानामक व्यक्तीसोबतच अनेक कंत्राटामंध्ये ते भागीदार असल्याची चर्चा असल्याने या चौकशीचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here