राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावात राजकारण तापणार
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – नुकत्याच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरळीतपणे पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला असून 15 डिसेंबर पासून आचारसंहिता लागणार आहे तर नवीन वर्षात 15 जानेवारीला मतदान व 18 जानेवारीला निकाल लागणार आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका कार्यक्रम जाहीर केल्याने खुलताबाद तालुक्यातील 39 ग्रामपंचायती पैकी 25 ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम लागला असून शुक्रवारी जाहीर करण्यात आला. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 15 डिसेंबर असून 23 डिसेंबरपासून ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नामनिर्देशन पत्र छाननी 31 डिसेंबर ,तर नामनिर्देशन पत्र मागे घेणे व चिन्ह वाटप 4 जानेवारी 2021, तर मतदान 15 जानेवारीला होणार असून मतमोजणी 18 जानेवारी असा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे.
दरम्यान तालुक्यातील गल्ले बोरगाव, कसाबखेडा, वेरूळ, बाजार सावंगी या चार मोठ्या गावांसह तालुक्यातील 25 गावच्या निवडणूका एकाचवेळी होत असल्याने तालुक्याचे सरपंच आरक्षण जाहीर झाल्यापासूनच गावागावांतील राजकारण चांगलंच तपायला लागले आहे. गल्ले बोरगाव येथे बऱ्याच कालावधीनंतर सरपंचपद सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी सुटल्याने येथे खूपच चुरस वाढली आहे. कसाबखेडा येथे महिला खुल्या प्रवर्गासाठी जागा सुटल्याने येथेही चुरस निर्माण झाली आहे, एकंदरीत ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत बरेच ठिकाणी अटीतटीची चुरशीची लढाई होत असल्याचे चित्र यावेळी तालुक्यात पाहायला मिळणार आहे. गावागावात कॉर्नर बैठका सुरू झाल्या असून उमेदवारांची वार्ड निहाय चाचपणी करण्यात पॅनल प्रमुख गुंतले असल्याचे दिसत आहे.त्यामुळे आता ग्रामीण भागात गावागावात चर्चा रंगायला लागल्या असून कोण बाजी मारतो, हे या निवडणुकांच्या निकालांतून कळणार आहे.
खुलताबाद तालुक्यातील निवडणुक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक नायब तहसीलदार अशोक कापसे, प्रभाकर गवळी, तलाठी डी.पी.गोरे, विनेश महेर, विनोद जाधव, भगवान घुसळे, हरिदास पांढरे संजय भुंगे विलास वाहुळ,कारभारी घुसळे आदी परिश्रम घेत आहे.







