मंत्र्यांना ड्रेसकोड लागू केला तर….

ramdas-athavale

केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला विचारला प्रश्न

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील ड्रेसकोड वाद सध्या चांगलाच गाजतोय. त्यातच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरूप ठरेल, अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते अशा निष्कर्षाला पोहोचत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला आहे.

 

काही वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील जीन्स आणि शर्ट अशा पेहरावात दिसले. पण रामदास आठवले यांना मात्र कायम रंगीबेरंगी कपड्यातच पाहायला मिळालं. त्यांनी वेगळी अशी एक ड्रेसिंग स्टाईल आहे. ते कायम रंगीत कपडे परिधान करून त्यावर एखादं जॅकेट घालून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावतात. आपल्या रंगीत पेहरावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रामदास आठवले यांनी थेट ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला. “राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी आणि नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई करण्यात आली आहे. अशी मनाई जर मंत्र्यांनाही लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?”, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

 

दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पोशाख कसा असावा याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांचा तसेच खासदार, आमदार असे लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकारी, खासगी कंपन्या, कार्यालयांचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचा दररोज वावर असतो. मंत्रालयात देश-विदेशातील नेते, अधिकारी येत असतात. कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची विशिष्ट छाप भेट देणाऱ्यांवर पडते. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करीत असताना कार्यालयातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाबद्दल तसेच वेशभूषेबद्दल जागरूक राहावे. आपली वेशभूषा ही शासकीय कार्यालयास अनुरूप ठरेल याची काळजी घ्यावी. सरकारी कार्यालयात काम करणारे अधिकारी-कर्मचारी विशेषत: कंत्राटी किंवा सल्लागार म्हणून काम करणारे शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरूप पोषाख घालत नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होत असल्याचे सांगत राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी पेहराव कसा असावा याची बंधने घातली आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here