नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर २७ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन चर्चा केली होती. त्यांनी जॉन्सन यांना त्यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे निमंत्रण बोरिस जॉन्सन यांनी स्वीकारले असून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी ही माहिती दिली आहे. भारत दौर्यावर आलेल्या ब्रिटिश परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, जॉन्सन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतात येतील. ब्रिटननं ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. यावर्षी ब्रिटनमध्ये जी ७ परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी मंगळवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारल्याची घोषणा केली.
जॉन्सन हे प्रजासत्ताक सोहळ्यातल्या कार्यक्रमात येणारे ब्रिटनचे दुसरे पंतप्रधान आहे. या आधी 26 जानेवारीच्या सोहळ्यात 1993मध्ये जॉन मेजर हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 नोव्हेंबरला जॉन्सन यांच्यासोबत फोनवरून चर्चा करत त्यांना आमंत्रित केलं होतं. तर जॉन्सन यांनी पंतप्रधानांना पुढच्या वर्षी ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी ७ देशांच्या शिखर परिषदेसाठी येण्याचं निमंत्रण दिलं.
ब्रिटेनमध्ये बेक्झिटची प्रक्रिया सुरू असताना जॉन्सन यांचा हा दौरा होत असून भारतासारख्या मोठी अर्थव्यवस्था आणि मार्केट असलेल्या देशांसोबत ब्रिटनला संबंध आणखी मजबुत करणं गरजेचं आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. भारतसोबत व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात संबंध मजबूत करण्याचा जॉन्सन यांचा प्रयत्न राहिल. यूरोपीयन यूनियनमधून बाहेर पडल्यानंतर बोरिस जॉन्सन ग्लोबल ब्रिटन या ब्रँडचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत.







