आ. रावल यांच्या फार्महाऊसवर जावून केली शिवीगाळप्रकरणी अनिल गोटेंसह पाच जणांवर गुन्हा

anil-gote

धुळे (प्रतिनिधी) – शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील आ. जयकुमार रावल यांच्या फार्महाऊसमध्ये प्रवेश करून आ. रावलासह शेतकर्‍याला शिवीगाळ करत धमकी दिल्यााप्रकरणी अनिल गोटे यांच्यासह चार ते पाच जणावंर दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रतापसिंग भीमसिंग गिरासे (वय 34 रा. आरावे ता. शिंदखेडा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काल दि. 11 डिसेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास पाढर्‍या रंगाच्या गाडीतून (क्र. एमएच 4 3366) चार ते पाच जण आमदार जयकुमार रावल यांच्या टाकरखेडा येथील तापी फार्महाऊस येथे आले.

त्यांनी गेटकिपर नाऊ पिरा मुसळकर यास फार्महाऊसचे गेट उघडण्यास सांगितले. परंतु मुसळकर यांनी गेट उघडण्यास नकार दिला. तेव्हा गाडीतील व्यक्तींनी गेटजवळ येवून गेटकिपरला धक्का देवून खाली पाडले. गेट उघडून आत प्रवेश करून प्रतापसिंग यांना आमदारांना फोन लावण्यास सांगून फोन हिसकावून फेकुन दिला. त्यानंतर स्वतःकडे असलेल्या फोनमध्ये फोटो काढू लागले.

तेव्हा प्रतापसिंग यांनी त्यांना विरोध केला असता त्यांनी आमदार जयकुमार रावल व प्रतापसिंग यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देवून निघुन गेले. त्यानुसार अनिल गोटे व सोबत असलेले चार ते पाच जण (नाव माहित नाही) सर्व रा. धुळे यांच्याविरूध्द भांदवि 447, 143, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि एस.टी. लोले करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here