मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूका २०२० – २०२१ कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १५ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्रातील १४ हजार ग्राम पंचायतीच्या निवडणूका होत आहेत. या कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील ‘निलंगा तालुक्यात’ ४२ ग्राम पंचायतीच्या निवडणूका पहिल्या टप्प्यात होत आहेत.
याच संदर्भात निलंगा तालुक्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार गणेश जाधव यांनी महाराष्ट्र निवडणूकीच्या निर्देशानुसार मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सोमवार, दिनांक २८ डिसेंबर ला निलंगा येथील केतकी संगमेश्वर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. निलंगा तालुक्यातील ४२ ग्राम पंचायतीच्या १६४ प्रभागात १८९ मतदान केंद्रावर ४६२ जागांसाठी दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. यासाठी १९ मतदान अधिकाऱ्यांची व जवळपास ८५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणूकीची पूर्व तयारी म्हणून मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
हे प्रशिक्षण सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत यावेळेत दोन सत्रात घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार अडसूळ यांनी केले. तहसिलदार गणेश गायकवाड यांनी मतदान केंद्राची पूर्वतयारी कशी करावी, माँक पोल कसे घ्यावे, केंद्राध्यक्ष, अधिकारी क्र १, अधिकारी क्र.२ व अधिकारी क्र.३ यांची कामे व प्रत्यक्ष मतदान कसे घ्यावे, शेवटी ई. व्ही. एम. (EVM) मशीन कशा सील कराव्यात. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अडसूळ यांनी संवैधानिक व असंवैधानिक पाकिटे कशी लिहावीत त्याचे सिलिंग कसे करावे, केंद्राध्यक्षाची डायरी काय असते व ती अचूक कशी लिहावी. याविषयी सविस्तर, सखोल मार्गदर्शन यावेळी केले.
सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणेच काम करुन ग्राम पंचायत निवडणूका सुरळीत पार पाडाव्यात यासाठी सर्वांनी सूचना दिल्या व शुभेच्छा दिल्या. तसेच दिनांक ५ आणि ६ जानेवारी २०२१ ला नियोजनानुसार तहसिल कार्यालय निलंगा येथे येवून इ. व्ही. एम. (EVM) मशिनचे प्रात्यक्षिक करावे. अशा सूचना दिल्या. दुसरे प्रशिक्षण हे दिनांक ८ जानेवारी ला तर तिसरे प्रशिक्षण व सहित्य तपासणी ही दिनांक १४ जानेवारी ला व प्रत्यक्ष मतदान दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटाला सुरु होईल ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिट या वेळेत होईल असे सांगितले गेले. तसेच कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करत हे प्रशिक्षण संपन्न झाले.







