मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार कार्यकाळ पूर्ण करेल’ असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
शरद पवार यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडीकडून नोटिसा देण्यात आल्या आहे. याआधी राज्यात असा प्रकार कधीच घडला नाही. ईडीच्या आड भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे’, अशी टीका शरद पवार यांनी केली.
‘ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी ही नोटीस मागे घेतली होती. मी कोणत्याही बँकेचा सदस्य नव्हतो, साधे खाते सुद्धा बँकेत नव्हते. तरीही नोटीस पाठवणार होते, ईडीच्या आड केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे’, अशी टीका पवार यांनी केली.
‘महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी हे सरकार कधी पडणार, यासाठी वेगवेगळ्या तारखा देत आहे. आधी त्यांनी दोन महिन्यांची मुदत दिली होती. नंतर सहा महिने सांगितले होते. पण सहा महिन्यात महाविकास आघाडी सरकार काही कोसळले नाही. पण त्यानंतर त्यांचे प्रयत्न सुरूच होते. त्यांनी नोव्हेंबरमध्ये सरकार पडणार असं सांगितले. उलट ठाकरे सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. ठाकरे सरकार हे स्थिर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.







