पाचेगावच्या ग्रामस्थांसह गावातून हाकललेल्या बलात्कार पीडित महिलेचा एसपी ऑफिससमोर ठिय्या

andolan

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – बलात्कार प्रकरणातील पीडित व पाचेगाव (ता.गेवराई) येथील गावकरी सोमवारी (दि.28) समोरासमोर आले. यावेळी परस्परविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. गावकऱ्य़ांनी पीडित महिला खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देते, असा दावा करून कारवाईची मागणी केली तर पीडितेने मी उद्धवस्थ झाले, आता मला गावातून हाकलून लावले जात असल्याचे सांगून टाहो फोडला.

याबाबत अधिक माहिती अशी, बीडमध्ये कुटुंबासोबत राहणारी एक महिला पाचेगाव येथे कापूस वेचणीसाठी गेली होती. 1 जानेवारी 2015 रोजी ती पाचेगाव येथून बीडला येण्यास खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्य़ा जीपमध्ये बसली होती. यावेळी चालकाने अन्य तीन मित्रांच्या मदतीने तिला गायरानात नेले. तेथे तिच्यावर सामुहिक अत्याचार करून नंतर गावातील तिच्या घरी नेवून पुन्हा बलात्कार केला होता. या प्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात 22 ऑक्टोबर 200 रोजी न्यायालयाने चौघांना दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे.

दरम्यान, तिच्या अल्पवयीन मुलीवरही बीडमध्ये बलात्कार झाला होता. यावरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. सध्या पीडिता आपल्या तीन मुलांसह पाचेगाव येथे वडिलांच्या घरी राहते. बलात्कार प्रकरणात चौघांना झालेल्या शिक्षेमुळे गावकरी व तिच्यात वितुष्ट आहे. दोन दिवसांपूर्वी पीडितेने सरपंचपतीसह अन्य काही जणांवर गेवराई ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर पीडितेवर अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद आहे.

असे असतानाच सोमवारी (दि.28) गावकरी पीडिता खोट्या तक्रारी करते व सतत धमकावून त्रास देत असल्याचे निवेदन देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. याचवेळी पीडिता देखील तेथे पोहोचली. तिने गावकऱ्य़ांसमोरच आपली कैफीयत मांडून आपल्याला गावातून हाकलण्याचा डाव आखला जात असल्याचे सांगून टाहो फोडला. गावकरी व पीडिता समोरासमोर आल्याने एकच गोंधळ उडाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here