पुरोगामी पत्रकार संघाकडून पत्रकारांना पाच लाखांचे विमा संरक्षण – विजय सुर्यवंशी पत्रकारांना सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन

purogami-patrakar-sangh

जालना (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्या पत्रकारांना 5 लाख रुपयांच्या अपघात विम्याचे संरक्षण कवच देणार असल्याची घोषणा पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी केली आहे. संघटनेचा राज्यभरात वेगाने विस्तार झाला असून जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून संघटनेचे सदस्यत्व स्वीकारावे ,असे आवाहन देखील श्री.सुर्यवंशी यांनी केले आहे.

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी पुरोगामी पत्रकार संघ काम करीत असून राज्यभरात संघटनेचा वेगाने विस्तार झालेला आहे. दरम्यान, स्वतः च्या घरावर तुळशीपत्र ठेऊन पत्रकारितेला वाहून घेतलेल्या पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचे काम पुरोगामी पत्रकार संघाने हाती घेतलेले आहे. नाममात्र शुल्क भरून पत्रकारांना पुरोगामी पत्रकार संघाचे अधिकृत सदस्यत्व देण्यात येणार असून यासोबत डिजिटल ओळखपत्र आणि 5 लाखांचा अपघात विमा देण्यात येणार आहे. राज्यभरातील वृत्तपत्रे, वृत्तवाहिनी, नभोवाणी, छायाचित्रे इत्यादी माध्यमांतील पत्रकारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून पुरोगामी पत्रकार संघाचे सदस्यत्व स्वीकारावे, असे आवाहन श्री.सुर्यवंशी यांनी केले आहे.

समग्र विकासासाठी विविध समित्यांची स्थापना
पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.याशिवाय शेती – शेतकरी विकास, आरोग्य संरक्षण,ग्रामीण विकास, महिला सशक्तीकरण, कामगार , युवकांचे प्रश्न, कला ,क्रीडा,साहित्य इत्यादी क्षेत्रात समग्र विकास साधण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ संचलित बळीराजा एकता समिती, आरोग्य विकास समिती,कामगार कल्याण समिती,युवक संघर्ष समिती, महिला व बाल विकास समिती,क्रीडा- कलाविश्व समिती आदी विविध समित्यांची राज्यभरात स्थापना करण्यात येऊन त्यामाध्यमातून समग्र विकासाला पाठबळ संघाकडून देण्यात येणार आहे.

गाव तिथे पुरोगामी..!
ग्रामीण भागात अजूनही सर्वांगीण विकास होताना दिसत नाही. तथापि, पत्रकार आपल्या लेखणीद्वारे याबाबत सातत्याने व्यवस्थेला जागे करण्याचा प्रयत्न करीत असतो.पत्रकारांच्या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ ‘गाव तिथे पुरोगामी’ ही अभिनव संकल्पना राबविणार आहे. प्रत्येक गावात ग्रामदूत तयार करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून गावातील समस्या सोडवण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणार आहे. यासाठी एक मंत्रालयीन समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे,अशी माहिती श्री. सुर्यवंशी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here