सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – येत्या 15 तारखेला ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी व स्थानिक नेत्यांनी आपापली तयारीही जोरात सुरू केली आहे. यातच पक्षात असलेले वाद विवाद गावागावातील भावकी ,गावकी चव्हाट्यावर देखील येत आहे.अनेक गावो गावी छोटे मोठे वादविवाद ,शाब्दिक चकमकी देखील पाहायला मिळत आहेत.
अशातच भिवंडी तालुक्यातील पिंपळास या गावी राहत असलेल्या म्हस्के कुटुंबीयांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ‘ एका नवऱ्याने आपल्या दोन बायकांना एकाच वार्डात उभे केले . ‘तर आता सरपंच व उपसरपंचपद एकाच घरात ‘ या कॅपशन सह पोस्ट व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे राज्यभरात हा चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावरील ही पोस्ट व्हायरल झाल्यामुळे त्या दोन्ही महिला उमेदवारांना आणि त्यांच्या नवऱ्यांना व घरातील सर्वांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतोय.
सौ.सुजाता कल्पेश म्हस्के व सौ कोमल कल्पेश मस्के या पिंपळास ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 4 ड मधून उभ्या आहेत. परंतु दोघींच्या पतींच्या नावाचा असलेला साम्यपणा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. कल्पेश बारक्या म्हस्के आणि कल्पेश सुरेश म्हस्के हे दोघे नातेवाईक असून कल्पेश बारक्या म्हस्के यांचा कल्पेश सुरेश म्हस्के हा चुलत भावाचा मुलगा लागतो. श्री कल्पेश बारक्या म्हस्के यांचे सुजताशी 2016 साली लग्न झाले तर कल्पेश सुरेश म्हस्के यांचा कोमलशी 2017 साली विवाह झाला आहे.
कोमल म्हस्के व सुजाता म्हस्के या दोघीही ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकाच वार्डातून शिवसेना पुरस्कृत असलेल्या अग्निमाता ग्रामविकास पॅनल कडून उमेदवार आहेत. मात्र, त्यांच्या या नावाचा साम्यपणा मतदारांना गोंधळात पाडतोय. आता याचा परिणाम निवडणुकीत काय होतो, हे निवडणुकीच्या निकालात समजेल.







