कार डिझायनर छाब्रियाने घातला कपिल शर्माला ५.७ कोटींचा गंडा

kapil-sharma

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – दिलीप छाब्रिया यांच्या डीसी डिझाइन्स कंपनीचे नवनवीन कारनामे उजेडात येत आहेत. हास्यकलाकार आणि अभिनेता कपिल शर्मा यालाही छाब्रिया यांनी साडेपाच कोटींचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. व्हेनेटी बस तयार करून देतो सांगून, कपिल शर्माची फसवणूक करण्यात आली.

स्वतःच बनविलेल्या महागड्या गाड्या स्वतःच खरेदी करायच्या, एकाच चेसिस आणि इंजिन नंबरची वेगवेगळ्या ठिकणी नोंदणी करायची आणि त्याआधारे एकाच वाहनावर अनेकदा कर्ज घेऊन ते बुडवायचे अशाप्रकारचा अनोखा वाहन घोटाळा मुंबई पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. भारताची पहिली स्पोर्ट्स कर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डीसी डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली. तपासामध्ये छाब्रिया यांनी अशाप्रकारे हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले. मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि त्यांच्या पथकाने छाब्रिया यांच्या मुंबई आणि पुणे येथील युनिटमध्ये छापा टाकून इंजिन, तसेच काही गाड्या हस्तगत केल्या.

याप्रकरणाचा तपास करीत असताना, डीसी कंपनीसोबत कपिल शर्माचे आर्थिक व्यवहार झाल्याचे समजताच त्याला माहिती देण्यासाठी गुरुवारी पोलिस आयुक्त कार्यालयात बोलविण्यात आले. त्यावेळी छाब्रिया यांनी आपल्यालाच फसविल्याचे कपिल याने सांगितले. ५ कोटी ३० लाख रुपये देऊन कपिलने मार्च २०१७ मध्ये एक व्हेनेटी बस बनवून देण्याची ऑर्डर दिली. २०१८ मध्ये व्हॅटचे जीएसटी झाल्यामुळे आणखी ४० लाख रुपये छाब्रिया यांनी कपिलकडून घेतले. २०१९ उजाडले तरी गाडी तयार न झाल्याने कपिलने ‘एनसीएलटी’कडे याबाबत तक्रार केली.

यानंतर डीसी कंपनीचे बँक अकाउंट्स गोठविण्यात आले. इतके होऊनही अकाउंट गोठविल्याने ६० लाख रोख रकमेची व्यवस्था कर, लगेच गाडी बनवून देतो असे छाब्रिया यांनी सांगितले. मात्र, कपिलने त्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या छाब्रिया यांनी गाडीच्या अर्धा सांगाड्याचे पार्कींगचे पैसे म्हणून १२ लाखांचे बिल कपिलला पाठविले. त्यामुळे अखेर सप्टेंबर २०२० मध्ये कपिलने आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. याबाबत चौकशी सुरू असतानाच छाब्रियाच्या अटकेमुळे हा प्रकार उघड झाल्याने नव्याने गुन्हा दाखल केला जात असून, याचा तपास गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक करणार असल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here