आटपाडी (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे आधूनिक वाल्मीकी ग . दि . माडगूळकर यांच्यावर मराठी माणसांप्रमाणे माणदेशी माणसांनी केलेले निखळ प्रेम म्हणजे माडगूळकर कुटुंबीयांची संचित पुण्याई आहे . या प्रेमाने मी भारावून गेलो असून यापुढे शेटफळे – माडगूळे न समजता एक विचाराने एकत्र येवून गदिमांच्या प्रतिभेला आणि व्यक्तीमत्वाला साजेल असे स्मारक शेटफळे – माडगुळ्यात पुर्णत्वास नेऊ , असे उदगार गदिमांचे नातू श्री . सुमित्र श्रीधर माडगुळकर यांनी शेटफळे येथे बोलताना काढले.
माडगुळे येथील गदिमा महोत्सवाचे निमित्ताने माणदेशात सहकुटुंब आलेले श्री सुमित्र माडगुळकर यांनी शेटफळे येथील गदिमा स्मारकाला सदिच्छा भेट दिली . त्यावेळी स्मारकस्थळी झालेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासननियुक्त ग. दि . माडगूळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य सादिक खाटीक हे होते.
पूर्वीचे सगळे मतभेद दुर सारून नव्या पिढीतील लेखकांना लिहते करणे महत्वाचे आहे . त्यासाठी आपण सर्व जण एकत्र येवून आपल्या परिसराला उन्नत करू . गदिमां सारख्या महाकवीला चांगल्या कृतीतून मानवंदना देवू असे ही सुमित्र माडगुळकर यांनी यावेळी स्पष्ट केले .
गदिमा स्मारक समिती शेटफळे आणि ग्रामस्थांचे वतीने श्री . सुमित्र माडगूळकर सौ . प्राजक्ता सुमित्र माडगूळकर आणि कु . पलोमा सुमित्र माडगूळकर यांचा सत्कार करणेत आला .
सुमित्र माडगूळकर यांनी गदिमांचे जन्मस्थान, वासूदेव मंदिर आणि गदिमांचे स्मारक परिसरास भेट देवून स्मारकाच्या परिपूर्णतेसाठी ग्रामस्थ आणि समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली . वासूदेव मंदिरात शकुंतला ताई, गदिमा जन्मस्थानी श्रीमती राजमती जवळे यांचे सुमित्र माडगूळकर यांनी आशिर्वाद घेतले .
आम्ही गदिमांचे शेटफळे येथील स्मारक परिपूर्ण व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. शेटफळे, माडगूळे, आटपाडी,पुणे येथे गदिमांच्या योग्यतेची स्मारके उभी रहावीत . गदिमांच्या चिरंतन स्मृती जतन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित कामाला लागू . माणदेशातल्या या साहित्यीक सांस्कृतीक चळवळीचे नेतृत्व सुमित्र माडगूळकर यांनी करावे असे आवाहन सादिक खाटीक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .
कु . पलोमा सुमित्र माडगूळकर या गदिमांच्या पणतीने गदिमांची दिंडी ही कविता अभिनयासह खड्या आवाजात सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली . प्रास्तावीक स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा .डॉ . सयाजीराजे मोकाशी यांनी केले . कार्यक्रमास दगडू तात्या गायकवाड, वामनराव गायकवाड, कृष्णराव गायकवाड ,बळीराम आबा गायकवाड ,प्रा संभाजीराव गायकवाड ,पोलीस पाटील दतात्रय क्षिरसागर ,नंदकुमार लोहार ,मेजर बाजीराव गायकवाड, सुरेश गायकवाड सर, सुनिल गायकवाड ,माजी सरपंच पांडुरंग गायकवाड ,प्रतापराव मोकाशी, डी . एस . जवळे, नंदकुमार जवळे, योगेश जवळे, कृपाचारी सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते . शेवटी प्रा .चंद्रकांत गायकवाड यांनी आभार मानले .







